दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन!

By Admin | Updated: January 6, 2015 01:21 IST2015-01-06T01:21:03+5:302015-01-06T01:21:03+5:30

जिल्हा परिषद पदाधिकारी-कर्मचा-यांच्या बैठकीत निर्णय.

One day's pay for help of drought victims! | दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन!

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन!

अकोला : जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धेच्या निधीतून शिल्लक उरणारा निधी आणि कर्मचार्‍यांच्या वेतनातून एक दिवसाच्या वेतनाची रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. अकोला जिल्हा परिषदेमार्फत अमरावती विभागीय जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचार्‍यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या खर्चासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून २0 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचार्‍यांकडून वर्गणी केली जात आहे. दरम्यान, यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी जमा निधीतून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि दुष्काळ व गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मदत देण्याच्या मुद्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांनी सोमवारी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन, चर्चा केली. विभागीय क्रीडा स्पर्धेच्या निधीतून शिल्लक राहणारी रक्कम आणि जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनातून एक दिवसाची रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, सभापती रामदास मालवे, सदस्य शोभा शेळके, जमीर पटेल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: One day's pay for help of drought victims!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.