उद्योजक व कंत्राटदाराला एक दिवसाची शिक्षा
By Admin | Updated: January 6, 2015 01:27 IST2015-01-06T01:27:57+5:302015-01-06T01:27:57+5:30
कामगाराचा अपघात आला अंगलट.
_ns.jpg)
उद्योजक व कंत्राटदाराला एक दिवसाची शिक्षा
अकोला: प्रेजिंग मशीनवर काम करण्याचा कोणताही अनुभव नसताना, कंपनीतील कामगारास बळजबरीने मशीनवर काम करण्यास भाग पाडून त्याच्या अपघातास कारणीभूत ठरणारे एमआयडीसी पायोनियर कंपनीचा मालक बिपीनकुमार हरनारायण धूत व कंत्राटदार एजाज अली खान अयुब खान याला सोमवारी १0 व्या न्यायदंडाधिकारी वाय.के. राऊत यांनी न्यायालयाने एक दिवसाची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास प्रत्येकी १0 दिवसांचा कारावास अशीही शिक्षा सुनावली. मासा येथील राहणारा रामा शालीकराम भागवत (२१) हा एमआयडीसीतील बिपीनकुमार धूत यांच्या मालकीच्या पायोनियर कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करीत होता. ३0 मार्च २00७ रोजी कंपनीचा मालक बिपीनकुमार धूत व कंत्राटदार एजाज अली खान यांनी रामा भागवत याला प्रेजिंग मशीनवर काम करण्यास सांगितले; परंतु रामाने प्रेजिंगवर काम करण्याचा अनुभव नसल्याचे सांगितले. या दोघांनीही त्याचे ऐकले नाही आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी देत, त्याला बळजबरीने प्रेजिंग मशीनवर काम करण्यास भाग पाडले. रामा हा मशीनवर काम करण्यास गेला असता, मशीन खाली आली आणि मशीनखाली त्याचा हात दबला. यात रामाच्या डाव्या हाताची तीन बोटे तुटली. आरोपींनी त्याला दवाखान्यातसुद्धा नेले नाही. त्यानंतर रामा भागवत याने ९ जून २00७ रोजी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात बिपीनकुमार व एजाज अली खान विरुद्ध तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध भादंवि कलम २८७, ३३८ (३४) नुसार गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली. नंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. बुधवारी १0 व्या न्यायदंडाधिकारी वाय.के. राऊत यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोघाही आरोपींना कलम २८७ मध्ये प्रत्येकी एक दिवसाची शिक्षा आणि कलम ३३८ मध्ये प्रत्येकी १ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १0 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे साहाय्यक सरकारी विधिज्ञ जी.एल. इंगोले यांनी बाजू मांडली.