माकडाने ढकलल्याने छतावरून पडून वृद्धेचा मृत्यू

By Admin | Updated: October 3, 2015 02:37 IST2015-10-03T02:37:52+5:302015-10-03T02:37:52+5:30

तेल्हारा तालुक्यातील घटना.

Older mother dies after falling from the roof after being driven by the monkey | माकडाने ढकलल्याने छतावरून पडून वृद्धेचा मृत्यू

माकडाने ढकलल्याने छतावरून पडून वृद्धेचा मृत्यू

तेल्हारा (अकोला) : बेलखेड येथील ७0 वर्षीय वृद्ध महिलेचा शुक्रवारी माकडाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही वृद्धा घराच्या छतावर गेली असता माकडाने तिच्यावर अचानक हल्ला चढविला. त्यामुळे खाली कोसळून तिचा मृत्यू झाला. बेलखेड येथील सरस्वताबाई शालीकराम मोडक (७0) या २ ऑक्टोबर रोजी सकाळी १0 वाजता कपडे वाळू घालण्याकरिता घराच्या छतावर गेली असता, तिच्यावर एका माकडाने अचानक हल्ला चढवला. माकडाने ढकलल्यामुळे त्या आधी ओसरीच्या टिनावर आणि नंतर जमिनीवर पडल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांचा मुलगा गणेश यांनी तातडीने तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात भरती केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बेलखेड येथे यापूर्वीसुद्धा ईश्‍वरी संतोष खुमकर (३) हिच्यावर माकडाने हल्ला केला होता. १५ दिवसांपूर्वी भावेश सूर्यकांत खुमकर (६) याच्यावरही असाच हल्ला झाला होता. माकडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली होती. सरस्वताबाई यांच्या पश्‍चात पती, ३ मुले, १ मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Older mother dies after falling from the roof after being driven by the monkey