तेल्हार्यात भांड्याचे दुकान फोडले
By Admin | Updated: September 7, 2014 23:59 IST2014-09-07T23:59:10+5:302014-09-07T23:59:10+5:30
३0 हजारांचा ऐवज लंपास : गस्तीवर प्रश्नचिन्ह

तेल्हार्यात भांड्याचे दुकान फोडले
तेल्हारा : शहरात गत काही दिवसांपासून सुरू असलेले चोर्यांचे सत्र थांबण्याचे नावच घेत नसून, शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी येथील मुख्य मार्गावरील एक भांड्याचे दुकान फोडून ३0 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवार, ७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, येथील मुख्य मार्गावरील भावना स्टिल होम या भांड्याच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी शनिवारच्या रात्री डल्ला मारला. दुकानावरचे टीनपत्रे कापून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला व १८ हजार रुपये किमतीच्या ३0 नग पितळी समई तसेच १२ हजार रुपये नगदी, असा एकूण ३0 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी शेजारच्या भावना ड्रेसेस या कापडाच्या दुकानाचे टीनपत्रे कापून चोरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. भावना स्टिल होमचे मालक शिवलाल हरिभाऊ फोकमारे यांच्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शहरात गत काही दिवसांपासून चोर्यांचे सत्र सुरू आहे. चोरट्यांनी जयस्वाल यांच्या बीअर बारवर ४0 हजार रुपयांनी हात साफ केला होता. तर साई मोबाईल शॉपीमधून ४0 हजार रुपयांचा माल चोरला होता. त्यानंतर साक्षी नगरमधील गणेश बावस्कार यांच्या घरी चोरी झाली होती. गत काही दिवसांमधील चोरीची ही चौथी घटना आहे. यामुळे पोलिस प्रशासनाच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.