अधिका-यांच्या मनमानीचा ‘सीएम’समोर वाचणार पाढा
By Admin | Updated: December 10, 2014 02:00 IST2014-12-10T02:00:09+5:302014-12-10T02:00:09+5:30
भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवकांनी नागपूरात ठाण मांडले.

अधिका-यांच्या मनमानीचा ‘सीएम’समोर वाचणार पाढा
अकोला : मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर व सहायक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शहरात मनमानी कारभार सुरू केल्याचा आरोप करीत भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवकांनी मंगळवारी नागपूर येथे ठाण मांडले. उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांसमोर दोन्ही अधिकार्यांच्या कार्यशैलीचा पाढा वाचणार असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
दुकान व्यावसायिकांना कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता दुकानांचे नामफलक काढण्याची कारवाई उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी २६ नोव्हेंबर रोजी केली होती. या मुद्दय़ावरून भाजप नगरसेवकांनी उपायुक्तांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, चिंचोलीकरांच्या दालनात ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांना धक्काबुकी झाल्याचा प्रकार घडला.
याप्रकरणी नगरसेवक अग्रवाल व उपायुक्त चिंचोलीकर यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी नोंदविल्या. उपायुक्तांच्या तक्रारीची दखल घेत, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी भादंविच्या कलम १४३, ३५३, ३४१, ३४२, ५0४, ५0६, ४२७ नुसार गुन्हा दाखल करून ८ डिसेंबरच्या मध्यरात्री भाजप नगरसेवक अजय शर्मा यांना राहत्या घरून ताब्यात घेतले. याप्रकरणी भाजप-सेनेच्या पदाधिकार्यांनी आक्षेप घेतल्यानंतर नगरसेवक अजय शर्मा यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करता त्यांना रात्री २ वाजता सोडून देण्यात आले. एकूणच, पोलिसांच्या विचित्र कारवाईमुळे संतप्त झालेल्या भाजप-सेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी नागपूर गाठले.
बुधवारी उपायुक्त चिंचोलीकर व सहायक पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांच्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाणार आहे.