अधिका-यांची दिवाळी; शहरात कच-याचे ढीग !
By Admin | Updated: November 13, 2015 02:04 IST2015-11-13T02:04:24+5:302015-11-13T02:04:24+5:30
अकोला महापालिकेचा साफसफाईला ठेंगा

अधिका-यांची दिवाळी; शहरात कच-याचे ढीग !
अकोला: ऐन दिवाळीच्या दिवसात शहरात साफसफाई, स्वच्छता असणे आवश्यक असताना महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मुख्य रस्त्यांवरच कचर्याचे ढीग साचले आहेत. आरोग्य विभागाने गुरुवारी मुख्य रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणांच्या साफसफाईला ठेंगा दाखविल्याने केळीच्या पानांसह विविध प्रकारची फुले व गवत विखुरल्याचे आढळून आले. तर संबंधित अधिकारी दिवाळीत मश्गुल असल्याचे समोर आले. अकोलेकरांच्या खिशातून वसूल होणार्या करातून मनपा कर्मचार्यांचे वेतन अदा केले जाते. या बदल्यात सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांची पूर्तता करणे मनपा प्रशासनाचे नैतिक कर्तव्य आहे. हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. साहजिकच, या सणाचे महत्त्व लक्षात घेता शहरात साफसफाई, पथदिवे आणि पाणीपुरवठय़ाची यंत्रणा कार्यरत असणे अपेक्षित आहे. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार दिसून येत आहे. दिवाळीच्या पर्वावर विविध साहित्य-वस्तूंची विक्री करण्यासाठी किरक ोळ व्यावसायिकांनी रस्त्यांलगत बाजार मांडला होता. यामध्ये प्रामुख्याने गांधी रोड, सिटी कोतवाली चौक, टिळक रोड, जैन मंदिर परिसर, गांधी चौक ते तहसील चौक, खुले नाट्यगृह ते काश्मिर लॉज, खुले नाट्यगृह ते धिंग्रा चौकाचा समावेश होता. दिवाळीच्या दिवशी सायंकाळी लघू व्यावसायिकांनी बाजार गुंडाळल्यानंतर रात्री किंवा गुरुवारी सकाळी संबंधित ठिकाणची साफसफाई करणे क्रमप्राप्त होते. गुरुवारी दिवसभर या ठिकाणी साफसफाईसाठी कोणीही फिरकले नसल्याने मुख्य रस्त्यांवर केरकचर्याचे ढीग साचल्याचे चित्र समोर आले. थकीत वेतनासाठी प्रशासनाकडे वारंवार निवेदन देणार्या सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांना यानिमित्ताने कर्तव्याचा विसर पडल्याची टीका होत आहे.