अधिकारी-पदाधिकारी वाद चिघळला!
By Admin | Updated: November 30, 2014 01:02 IST2014-11-30T00:55:15+5:302014-11-30T01:02:20+5:30
उपायुक्तांच्या निलंबनाचा ठराव मांडणार; पदाधिका-यांची पत्रकार परिषदेत घोषणा.

अधिकारी-पदाधिकारी वाद चिघळला!
अकोला: महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकार्यांमधील वाद चिघळला आहे. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी आजपर्यंत केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला नगरसेवकांनी कधीही अडथळा निर्माण केला नाही. शहर विकासासाठी नियमानुसार कारवाई करणार्या अधिकार्यांना भाजपचा कधीही विरोध नाही; परंतु चिंचोलीकरांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार अशोभनीय असल्यामुळे त्यांच्या विरोधात निलंबनाचा ठराव मांडला जाईल, अशी घोषणा महापालिका पदाधिकार्यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून कलम २४४ व २४५ नुसार उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज हटविणे अपेक्षित आहे. यामध्ये दुकानाच्या नामफलकाचा समावेश नाही. शिवाय न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सायंकाळी सात वाजतानंतर अतिक्रमण हटाव मोहीम राबवता येत नाही. संबंधित अधिकारी क्षेत्रीय अधिकार्यांसमवेत केवळ पाहणी करू शकतात. असे असताना उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी होर्डिंग्ज हटवण्याच्या नावाखाली २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातनंतर दुकानांचे फलक व पाट्या काढण्याची मोहीम सुरू केली. ही बाब सर्वथा कायद्याचा व उच्च न्यायालयाच्या सूचनांचा अवमान करणारी असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी दिली. ही कारवाई नेमकी कोणत्या नियमांच्या आधारे केली, अशी विचारणा महापौर उज्ज्वला देशमुख यांनी केली असता, चिंचोलीकरांनी लेखी पत्र देण्याची मागणी केली. आम्ही त्यांच्या दालनात जाऊन या नियमांची विचारणा केली असता, त्यांनी उत्तर न देता, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या समक्ष धक्काबुक्की केली. उपायुक्त चिंचोलीकर यांना समस्यांचे निराकरण करण्याची विनंती केल्यावर ते उर्मट व उद्धटपणाची वागणूक देतात. या शहरात अधिकार्यांच्या विकासात्मक कामात कधीही हस्तक्षेप होणार नाही; परंतु विकास न करता, मनमानी कारवाया केल्यास हा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नसल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. यासाठी येत्या २ डिसेंबर रोजी विशेष सभेमध्ये चिंचोलीकर यांच्या निलंबनाचा ठराव घेणार असल्याची माहिती अग्रवाल यांनी यावेळी दिली.
*मनपाची २ डिसेंबर रोजी विशेष सभा
उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या विरोधात ठराव घेण्यासाठी २ डिसेंबर रोजी मनपात विशेष सभेचे आयोजन केल्या जाईल. शनिवारी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली.