नायलॉन मांजावरील बंदी धाब्यावर!
By Admin | Updated: January 14, 2015 01:20 IST2015-01-14T01:20:15+5:302015-01-14T01:20:15+5:30
परराज्यातून होते आयात; न्यायालयाच्या आदेशाकडे व्यावसायिकांचे दुर्लक्ष
_ns.jpg)
नायलॉन मांजावरील बंदी धाब्यावर!
विवेक चांदूरकर /अकोला:
न्यायालयाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातली असली तरी शहरात चौकाचौकांत खुलेआम विक्री होत आहे. बाजारपेठेत साधा मांजाच उपलब्ध नाही. आंध्रप्रदेशातील बंगळुरु, उत्तर प्रदेशातील बरेली व दिल्ली येथील काही नामांकित कंपन्याही हाच मांजा बनवत असून, त्याची विक्री शहरात करण्यात येत आहे.
शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत आहे. न्यायालयाच्या आदेशाला झुगारून व्यावसायिक बिनधास्तपणे विक्री करीत आहेत. शहरातील सिंधी कॅम्प, जठारपेठ, तेलीपुरा व जुन्या शहरात नायलॉन मांजाची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. याच भागात पतंग विक्रीचीही अनेक दुकाने आहेत. त्यामुळे या ठिकाणी या व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल होते. ह्यलोकमतह्णने नायलॉन मांजाच्या विक्रीबाबत केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गैरकायदेशीर असलेल्या या मांजाची उलाढाल लाखो रुपयांची असल्याचे उघडकीस आले आहे. दुकानांमध्ये साध्या मांजाची कमी व नायलॉन मांजाचीच जास्त विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. व्यावसायिकही अव्वाच्या सव्वा भाव सांगून ग्राहकांच्या माथी हा मांजा मारतात. शहरातील व्यावसायिक पतंगीसाठी मांजा परराज्यातून एकाच वेळी बोलावितात. ट्रकमध्ये भरून मांजा आणला जातो. त्यानंतर हा माल दुकान किंवा घरांमध्ये ठेवण्यात येतो. ग्राहकांकडून नायलॉन मांजालाच जास्त मागणी असल्यामुळे व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे.
*.असे केले स्टिंग
शहरातील तेलीपुरा, सिंधी कॅम्प, जुने शहर व जठारपेठेत नायलॉन मांजाची विक्री केली जाते. दुपारी १ वाजता लोकमतच्या चमूने तेलीपुरा भागात जाऊन नायलॉन मांजाची खरेदी केली. या ठिकाणी व्यावसायिक सर्रास मांजा खरेदी करीत असल्याचे लक्षात आले. यानंतर सिंधी कॅम्पमध्ये जाऊन नायलॉन मांजा मिळतो का, याची पाहणी करण्यात आली. या परिसरातही दुकानांमध्ये सर्रास नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. जुने शहर व जठारपेठ भागातही या मांजाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले.
*नायलॉनचा मांजा : स्वस्त व मजबूत म्हणूनच पसंती
साधा मांजा बाजारात मिळतच नाही. त्यातही त्याची किंमत जास्त असते. त्यामुळे पतंग उडविणारे स्वस्त व तुलनेने मजबूत असलेल्या नायलॉनच्या मांजाला पसंती देतात. नायलॉनचा मांजा लांबत असल्यामुळे पतंग लवकर कटत नाही तसेच हा मांजा एकदा खरेदी केल्यावर ठेवून दिला तरी खराब होत नाही. साध्या मांजाचा धागा दुसर्या वर्षी सडत असल्यामुळे तुटतो. त्यामुळे नागरिक नायलॉन मांजाला पसंती देतात.
*विविध राज्यांतून ट्रकमधून होते नायलॉन मांजाची आवक
दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व आंध्र प्रदेशातून अकोल्यात नायलॉनचा मांजा आणला जातो. पश्चिम बंगाल व दिल्ली येथे मांजा बनविणार्या काही मोठय़ा कंपन्या आहेत. या कंपन्यांचा मांजा येथे ट्रकमधून आणण्यात येतो. यापैकी मोनो काइट व पांडा यांसह काही कंपन्यांच्या मांजाला अकोल्यात विशेष मागणी आहे. अकोल्यातील व्यावसायिक एकाच वेळी ऑर्डर देत असल्यामुळे ट्रकमध्ये लाखो रुपयांचा माल आणण्यात येतो.
*लोकमत चमूपाठोपाठ पोलीसही पोहोचले..
९0 हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त; नऊ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल
४ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजावरील बंदी कायम ठेवल्याने मंगळवारी दुपारी साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनात अँन्टी गुंडा स्क्वॉडने शहरात नायलॉन मांजाची विक्री करणार्या विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी ९0 हजार ५00 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आणि शहरातील नऊ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले.