परिचारिकेचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: February 2, 2016 01:55 IST2016-02-02T01:55:53+5:302016-02-02T01:55:53+5:30
पतीने हत्या केली, वडिलांची तक्रार;पतीवर गुन्हा दाखल.

परिचारिकेचा संशयास्पद मृत्यू
रिसोड (जि. वाशिम): तालुक्यातील मोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या कंत्राटी परिचारिकेचा क्लोरोक्वीन कंपनीच्या गोळ्या सेवन केल्यामुळे १ फेब्रुवारी रोजी सकाळी मृत्यू झाला. परिचारिकेच्या वडिलांनी त्यांच्या मुलीची जावयाने झोपेच्या गोळ्या देऊन हत्या केल्याचा आरोप केला आहे. मोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्मिता गजानन कंकाळ (२६) या कंत्राटी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास स्मिता यांना रिसोड येथील खासगी रुग्णालयात क्लोरोक्वीन कंपनीच्या गोळ्या सेवन केल्याने प्रकृती बिघडल्यामुळे पतीने दाखल केले होते. उपचारादरम्यान सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनुसार रिसोड पोलिसांनी सदर परिचारिकेने औषधी म्हणून घेतलेल्या गोळ्यांमुळे आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली. सोमवारी दुपारी सदर परिचारिकेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात स्मिता यांची पतीने झोपेच्या गोळ्या देऊन हत्या केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी मृतकाचे पिता परशुराम सुर्वे यांनी फिर्याद नोंदविली की मुलगी आणि जावई गजानन कंकाळ मोप येथे राहत होते. याबाबत स्मिता वारंवार पित्यास जावयाच्या वागणुकीबद्दल तक्रार करीत होती. जावई छोट्या-छोट्या कारणावरून त्रास देत होता व नेहमीच वाद घालत होता. तसेच आई- वडिलांना माहिती दिली तर जिवे मारण्याची धमकी देत होता, अशी फिर्याद नोंदविली आहे. तक्रारीवरून गजानन कंकाळविरुद्ध कलम ४९८, ३0६, ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.