नापिकीने हिरावले सौभाग्याचे कुंकू!
By Admin | Updated: April 17, 2016 01:14 IST2016-04-17T01:14:03+5:302016-04-17T01:14:03+5:30
देऊळगावराजा तालुक्यातील चिंचोली बुरकूलची घटना; युवा शेतकर्याची आत्महत्या चटका लावणारी.

नापिकीने हिरावले सौभाग्याचे कुंकू!
नीलेश शहाकार / बुलडाणा
विलास व ज्योती यांच्या संसार वेलीवर उमललेले पायल नावाचे लहान फूल..या तिघांचा परिवार दीड एकर शेतीवर आपला चरितार्थ चालवत होता.. शेतातील उत्पन्नाला जोड म्हणून ते शे तमजुरीही करायचे आणि संसाराचा गाडा हाकायचे ..पण या संसाराला दृष्ट लागली..दोन दिवसां पूर्वी घराच्या कर्त्याधर्त्या विलासने फासावर लटकवून घेतले..अन् सर्व होत्याचे नव्हते झाले. ज्योतीच्या सौभाग्याचे कुंकू रुसले, तर तीन वर्षाच्या पायलच्या डोक्यावरील पितृछत्र हरविले. हे सर्व नापिकीने केले..
देऊळगावराजा तालुक्यातील चिंचोली बुरकूल येथे विलास जगन बुरकूल या २५ वर्षीय युवा शे तकरी परिवराची ही व्यथा. चार वर्षांपूर्वी नजीकच्या खैरव गावातील ज्योती हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. लग्नानंतर विलास आई-वडिलापासून वेगळा राहायला लागला. त्यांना मुलगी झाल्यानंतर वाढलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवत, विलासने आपल्या शेतात आणखी कष्ट करण्यास सुरुवात केली; मात्र त्याच्या कष्टाला निसर्गाने साथ दिली नाही. विलासकडे असणार्या चिंचोली शिवारात गट नं.९६ मधील दीड एकर कोरडवाहू शेतात त्याने २0१४ मध्ये सोयाबीनची पेरणी केली; मात्र ऐन हंगामात पावसाने पाठ फिरवली व पीक हातचे गेले. निसर्गाशी दोन हात करीत दुबार पेरणीसाठी विलासने स्टेट बँक ऑफ हैदराबाद देऊळगावराजा शाखेतून कर्ज घेतले; मात्र त्याच्या मागे लागलेली नापिकीची साडेसाती थांबता थांबत नव्हती. २0१५ मध्ये खासगी कर्ज घेत, त्याने शेतात कपाशी पेरली. कपाशी बोंडावर आली यावेळी अवकाळी पावसामुळे सारे पीक जमीनदोस्त केले. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा अशा वैफल्यग्रस्त परिस्थितीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी उभी केलेली शेतीची लढाई हा युवा शेतकरी हरला होता. पत्नी ज्योती व चिमुकली पायल या दोन जिवांचा विचार न करता, विलासने मृत्यूला जवळ केले. यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.