आता काय जखमांवर मीठ चोळायला आले ?
By Admin | Updated: April 24, 2015 02:13 IST2015-04-24T02:13:56+5:302015-04-24T02:13:56+5:30
कापशी येथील संतप्त ग्रामस्थांचा आयजींना सवाल

आता काय जखमांवर मीठ चोळायला आले ?
मंगेश च-हाटे / कापशी (जि. अकोला): कापशी गावामध्ये अनेक वर्षांपासून जुगार चालतो. आजपर्यंतही पोलिसांनी जुगारावर छापा टाकला नाही. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळणार्या आरोपींना अटक करण्याऐवजी निष्पाप ग्रामस्थांना खाकी वर्दीचा धाक दाखवत अमानुष मारहाण केली. यात अनेक महिला, पुरुष जखमी झाले. पोलीस कायद्याचे रक्षक आहेत की भक्षक? पोलिसांनी मारहाण करायची, आमच्या मुलाबाळांना, लेकी-सुनांना जखमी करायचे; आता काय पोलीस विशेष महानिरीक्षक आमच्या जखमांवर मलम लावायले आले, असा संतप्त सवाल कापशी ग्रामस्थांनी आयजी चंद्रकांत उघडे यांना केला. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे यांनी गुरुवारी कापशी गावाला भेट देऊन ग्रामस्थांची चौकशी केली. चौकशीदरम्यान संतापलेल्या ग्रामस्थांनी आयजींवर प्रश्नांचा चांगलाच भडीमार केला. ग्रामस्थांचा संताप आणि आक्रोश पाहून आयजी उघडेही गोंधळून गेले होते. ग्रामस्थ अजाबराव पाटील चतरकर, वसंत पाटील चतरकर, सूर्यभान राठोड, रामदास गावंडे, दगडू मानतकर, गोकर्णाबाई मानतकर, आशाबाई तायडे, मनोहर येवले, नीलेश पाटील चतरकर, अन्नपूर्णा चतरकर, कल्पना गजानन पारखडे, जयश्री दत्ता पारखडे, पुरुषोत्तम चतरकर आदींच्या घरी आयजी चंद्रकांत उघडे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी जाऊन चौकशी केली. या ग्रामस्थांनी त्यांच्या मोटारसायकली, कारची केलेली नासधूस आणि घरातील दरवाजे, खिडक्या व वस्तूंची केलेली तोडफोड, महिला, पुरुषांसोबतच गुराढोरांना केलेली मारहाणही आयजी उघडे यांना दाखविली.पोलीस गुंडांवर कारवाई करीत नाहीत आणि स्वत:च गुंडगिरी करून निष्पाप ग्रामस्थांना मारहाण करतात. पोलिसांच्या मारहाणीत अनेकजण जखमी झाले. पोलिसांनी जुगार्यांवर कारवाई करण्याऐवजी ग्रामस्थांना वेठीस धरल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी आयजी उघडेंकडे मांडल्या.