.आता रेल्वे, फलाटांवरील बेवारस बालकांवर राहील नजर!
By Admin | Updated: March 5, 2015 01:54 IST2015-03-05T01:54:33+5:302015-03-05T01:54:33+5:30
रेल्वे प्रशासन घेणार दखल, दरवर्षी होतात लाखावर बालकं बेपत्ता.

.आता रेल्वे, फलाटांवरील बेवारस बालकांवर राहील नजर!
राम देशपांडे / अकोला : रेल्वे गाड्या व फलाटांवर बेवारस स्थितीत फिरणार्या बालकांची दरवर्षीची सरासरी संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्याचे निर्देश केंद्रिय रेल्वे अधिकार्यांनी २ मार्च रोजी चारही झोनमधील रेल्वे स्थानक प्रबंधकांना दिले आहेत.
२0१0 ते २0१४ या पाच वर्षात रेल्वेच्या चारही झोनमधील सर्व रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलीस फोर्स (आरपीएफ) आणि गव्हर्मेंट रिझर्व पोलीस प्रोटेक्शन (जीआरपी) ला आढळून आलेल्या बेवारस बालकांची आकडेवारी ग्राहय़ मानून केंद्रीय रेल्वे प्रशासनाने फेब्रुवारी २0१४ मध्ये सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणावरून दरवर्षी ७0 हजार ते १ लाख २0 हजार बालके हरविल्याच्या तक्रारी रेल्वे पोलिसांकडे नोंदविल्या गेल्या आहेत. सर्वेक्षणाअंती स्पष्ट झालेल्या या आकडेवारीनंत र ेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर बेवारस स्थितीत फिरणारी बालके प्रवासादरम्यान आपल्या कुटुंबीयांपासून दुरावतात किंवा मतिमंद, अपंग किंवा अनैतिक संबंधातून जन्मलेली अनाथ मुले काही लोक सोडून निघून जातात. आपल्या आप्तांपासून दुरावलेली ही मुले काही असामाजिक तत्त्वांच्या हाती लागत असल्याची गंभीर बाब भारतीय रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलले आहे. यासाठी रेल्वेस्थानकांवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये वाट चुकलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक सामाजिक संस्थांची मदत घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. या आदर्श प्रणालीमध्ये गवसणार्या बालकांच्या सर्वसामान्य गरजा पूर्ण करून त्यांना कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देश प्रबंधकांना तसेच आरपीएफ व जीआरपी पोलिसांना देण्यात आले आहेत.
*भुसावळ मंडळात गवसले ५२ बालके
भुसावळ मंडळात लहान बालकांची पळवून त्यांना इतर प्रदेशात विकणारी टोळी सक्रिय असल्याच्या बाबीला भुसावळ मंडळ रेल्वे पोलीस आयुक्त चंद्रमोहन मिश्रा यांनी दुजोरा दिला आहे. त म्हणाले की, नाशिक रोड ते बडनेरा या मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात वर्ष २0१४ मध्ये ५२ बालके रेल्वे पोलिसांना गवसली. नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर व बडनेरा रेल्वे स्थानकांवर आढळून आलेल्या या बालकांना प्रथम भुसावळ येथील बाल सहाय्यता केंद्रात आणले जाते. या ठिकाणी त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यासाठी प्रयत्न केले जातात. बेवारस स्थितीत सापडलेल्या मुलांची प्राथमिक माहिती व त्यांचे फोटो रेल्वेच्या संकेतस्थळावर प्रकाशित केले जातात. कुणीच नसलेल्या बालकांना अखेरीस जळगावच्या राज्यस्तरीय बाल सहाय्यता कमिटीच्या सुपूर्द केले जाते, असेही त्यांनी सांगितले.