आता एका प्रभागासाठी एक आराेग्य निरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:33+5:302021-05-30T04:16:33+5:30
शहरात स्वच्छतेच्या कामावर महापालिका दरवर्षी काेट्यवधी रुपयांचा खर्च करीत असले, तरी ठिकठिकाणी साचलेला कचरा, घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्या, धुळीने ...

आता एका प्रभागासाठी एक आराेग्य निरीक्षक
शहरात स्वच्छतेच्या कामावर महापालिका दरवर्षी काेट्यवधी रुपयांचा खर्च करीत असले, तरी ठिकठिकाणी साचलेला कचरा, घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्या, धुळीने माखलेले रस्ते असे किळसवाणे चित्र पाहावयास मिळते. स्वच्छतेच्या कामासाठी मनपाच्या आस्थापनेवर ७४४ कर्मचारी असून, पडीक वार्डासाठी ५४० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा फाैजफाटा तैनात केला आहे. यांचे वेतन व मानधनापाेटी वर्षाकाठी २९ काेटींचा खर्च हाेताे. या बदल्यात सार्वजनिक जागा, मुख्य रस्ते आदी ठिकाणचा कचरा जमा करण्यासाठी ३३ ट्रॅक्टरची व्यवस्था असून, त्यांचे इंधन, चालक व इतर मजुरांच्या मानधनावर लाखाे रुपये खर्च हाेतात. तरीही शहरात सगळीकडे अस्वच्छता दिसून येते. दरम्यान, साफसफाईच्या संपूर्ण कामावर देखरेख व लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्वच्छता विभागाने आराेग्य निरीक्षकांवर साेपविली असली, तरी बाेटावर माेजता येणारे प्रामाणिक आराेग्य निरीक्षक वगळता, इतर आराेग्य निरीक्षक कर्तव्याला दांडी मारत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अतिरिक्त आराेग्य निरीक्षकांना घरचा रस्ता दाखवल्यानंतर, प्रशासनाने एका प्रभागासाठी एका आराेग्य निरीक्षकाची नियुक्ती केली आहे.
२० आराेग्य निरीक्षक ठेवतील देखरेख
स्वच्छता व आराेग्य विभागात ४४ आराेग्य निरीक्षक सेवारत हाेते. यापैकी आयुक्तांनी कंत्राटी १४ व दाेन मानसेवी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली, तसेच वर्ग चारमधील इतर आठ प्रभारी आराेग्य निरीक्षकांना मूळ आस्थापनेवर परत पाठविले. यापुढे २० आराेग्य निरीक्षक प्रभागातील स्वच्छतेच्या कामावर लक्ष ठेवतील.
‘एसआय’च्या कामाचे हाेणार मूल्यमापन
प्रभागात अस्वच्छता दिसल्यास, त्याला सर्वस्वी आराेग्य निरीक्षकांना जबाबदार मानले जाणार आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन हाेणार असून, कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आल्यास, कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, आयुक्त अराेरा यांच्या निर्णयामुळे आराेग्य निरीक्षकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.