रोपवाटिकांमधून आता रोपांचे मोफत वाटप!
By Admin | Updated: July 23, 2014 00:32 IST2014-07-23T00:32:05+5:302014-07-23T00:32:05+5:30
सामाजिक वनीकरणचा उपक्रम: शाळा, सामाजिक संस्थांना मिळणार लाभ

रोपवाटिकांमधून आता रोपांचे मोफत वाटप!
खामगाव : सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमध्ये पडून असलेल्या रोपांच्या विक्रीला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने, शासनाने ही रोपं शाळा तसेच सामाजिक संस्थांना मोफत वाटण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणप्रेमींकडून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
पर्यावरणाचा दिवसेंदिवस होणारा र्हास घातक असून, त्यादृष्टीने वृक्षारोपणास शासनस्तरावर विशेष महत्व दिले जाते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असून, वृक्षारोपणास चळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे. वृक्षारोपणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाकडून भर दिला जातो; मात्र २0१२ साली राज्यात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाल्याने, सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून वृक्षांचा विनियोग झाला नव्हता.
त्यामुळे आतापर्यंत सामाजिक वनीकरण विभागाच्या राज्यातील रोपवाटिकांमध्ये १.२९ कोटी रोपं पडून होती.
एकीकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रोपं पडून असताना, केवळ कुशल खर्च निघावा म्हणून शासनाने यावर्षी रोप विक्रीचा निर्णय घेतला होता. रोप खरेदीसाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने, महाराष्ट्र ग्राम रोजगोर हमी योजनेंतर्गत २0१४ च्या पावसाळ्यात लागवडीनंतर शिल्लक राहिलेल्या रोपांचे मोफत वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी केंद्र तथा राज्य शासनाच्या काही विभागांची मदत घेतली जाणार आहे.
** वृक्ष जगविण्यासाठी बंधपत्र
सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून रोपं घेणार्यांना रोपाची लागवड आणि संवर्धनाबाबत बंधपत्र भरुन द्यावे लागणार आहे. या बंधपत्रामुळे वृक्षसंवर्धनात भर पडण्यास मदत होणार आहे.
** रोपांची किंमत कमी
रोपांचे मोफत वाटप करण्यासाठी शासनाने काही अटी आणि शर्ती निश्चित केल्या आहेत. त्यामुळे सर्वच रोपांचे मोफत वाटप शक्य नसून, काही रोपांची विक्रीही केली जाणार आहे. त्यासाठी शासनाने रोपांच्या किमती कमी केल्या आहेत. त्यानुसार ९ महिने वयोमानाचे दीड ते दोन फूट उंचीचे रोप प्रतिनग ८ रुपयांऐवजी १ रुपया तर १८ महिने वयोमानाचे ४ ते ५ फूट उंचीचे रोप प्रतिनग ४१ ऐवजी १0 रुपये या दराने विक्री होणार आहे.