आता एसटीत मिळणार तक्रार पुस्तिका!
By Admin | Updated: January 17, 2015 00:05 IST2015-01-17T00:05:39+5:302015-01-17T00:05:39+5:30
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी वाहकावर सोपवली जबाबदारी.

आता एसटीत मिळणार तक्रार पुस्तिका!
अकोला : प्रवासात एसटीच्या सेवेबाबत कुठलीही तक्रार असेल, तर आता बसस्थानक येण्याची वाट पाहण्याची गरज यापुढे भासणार नाही. कारण प्रवाशांना तक्रार देण्यासाठी आता एसटीमध्येच तक्रार पुस्तिका उपलब्ध करुन देण्यात येणार असून, वाहकावर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियमाचा भंग करणार्या वाहकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळातील सूत्रांनी सांगितले.
खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्याअनुषंगाने एसटी बसमधून प्रवास करताना प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तक्रार नोंदवण्यासाठी वाहकाकडे तक्रार पुस्तिका ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या अडचणी तत्काळ सोडविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. वाहकाने प्रवाशास तक्रार पुस्तिका उपलब्ध न केल्यास प्रवासी आगारात पोहोचल्यानंतर वाहतूक नियंत्रक कार्यालयातील पुस्तिकेत तक्रारीची नोंद करू शकतील.
तक्रार पुस्तिकेचे जतन करण्याची जबाबदारी वाहकालाच देण्यात आली आहे. पुस्तिका हरविल्यास त्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल आणि दंडवसुलीनंतर तत्काळ पर्यायी तक्रार पुस्तिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवासी आणि एसटी महामंडळातील संवाद वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने ही योजना धुळे विभागात अलिकडेच राबविण्यात आली. आता राज्यातील सर्व विभागांमध्ये ही योजना सुरू होणार आहे. राज्य परिवहन महामंडळातील केंद्रीय अधिकार्यांनी याबाबत राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना आदेश दिले आहेत.
दरम्यान वाहकांना सूचना व तक्रार पुस्तिका देण्यात येणार असल्याचे अकोला विभागाचे नियंत्रक ए एम सोले यांनी स्पष्ट केले. या योजनेची प्रभावीपणे अमलबजावणी करण्यासाठी अकोला विभागातील सर्व आगार व्यवस्थापकांना व वाहकांना निर्देश दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.