‘आदर्श गाव’ पुरस्कारासाठी आता स्वच्छ पांदण रस्त्यांची अट!
By Admin | Updated: July 26, 2016 01:51 IST2016-07-26T01:51:49+5:302016-07-26T01:51:49+5:30
स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हगणदरीमुक्त रस्ते

‘आदर्श गाव’ पुरस्कारासाठी आता स्वच्छ पांदण रस्त्यांची अट!
हर्षनंदन वाघ/ बुलडाणा
ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे, या दृष्टिकोनातून गाव परिसरातील पांदण रस्ते हगणदरीमुक्त व स्वच्छ झाल्याशिवाय त्या गावास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव आणि संत गाडगेबाबा यांच्या संकल्पनेतील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेता येणार नाही. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते विकसित होण्यासाठी मदत होणार आहे.
मागील वर्षी राज्य शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाला तात्पुरती स्थगिती दिली होती. याबाबत अनेक गावांतील सरपंचांनी जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाला जाब विचारला होता. यासंदर्भात मंत्रिमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर येत्या २ ऑक्टोबरपासून अभियानाची पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे. हगणदरीमुक्त रस्त्यासह गावातील सर्व बाबींची तपासणी झाल्यानंतरच ग्राम स्वच्छता अभियानात गावाचा समावेश होणार की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. शासनाच्या या निर्णयामुळे गाव शिवारातील रस्ते हगणदरीमुक्त होण्यास मदत होईल. तसेच पांदण रस्त्यांचेही रूप यामुळे बदलण्यास मदत होईल.
पुरस्काराच्या रकमेतही वाढ!
ग्राम स्वच्छता अभियानात चांगले काम करणार्या गावांच्या पुरस्कारांच्या रकमेतही आता वाढ करण्यात आली आहे. तालुका पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीला पूर्वी २५ हजार, द्वितीय १५ हजार, तर तृतीय १0 हजार, अशी रक्कम दिली जात होती. आता प्रथम पुरस्कार एक लाख रुपये, द्वितीय ५0 हजार रुपये, तर तृतीय २५ हजार रुपये पुरस्कार देण्यात येणार आहेत.