महापौरपदाच्या आरक्षणाची अधिसूचना मिळाली!
By Admin | Updated: August 30, 2014 01:37 IST2014-08-30T01:37:24+5:302014-08-30T01:37:40+5:30
अकोला महापौर पदाच्या आरक्षणाची अधिसूचना प्राप्त; निवडणुकीचा मार्ग मोकळा.

महापौरपदाच्या आरक्षणाची अधिसूचना मिळाली!
अकोला : महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत १६ ऑगस्ट रोजी काढण्यात आल्यानंतर निवडणुकीच्या तारखेची अनेकांना उत्सुकता लागली होती. आरक्षणाची अधिसूचना मनपाला प्राप्त झाली असून, यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. याकरिता विभागीय आयुक्तांची परवानगी घेण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
महापालिकेच्या महापौरपदाचा अडीच वर्षांंचा कालावधी येत्या ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्या पृष्ठभूमीवर मुंबईत आगामी अडीच वर्षांंच्या कालावधीसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत १६ ऑगस्ट रोजी काढण्यात आली असता, अकोला मनपासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाले. मार्च २0१२ मध्ये महापौरपदाकरिता अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील महिला उमेदवाराचे आरक्षण निघाले होते. त्यावेळी महापौरपदाची संधी भारिप-बहुजन महासंघाच्या ज्योत्स्ना गवई यांच्याकडे चालून आली. तूर्तास महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाल्यामुळे या पदावर विराजमान होण्यासाठी इच्छुक महिला नगरसेविकांनी जोरदार तयारी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास महापौरपदाची निवडणूक लांबण्याची अनेकांना धास्ती होती. मात्र आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यावरदेखील महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेता येतो. नुकतीच आरक्षणाची अधिसूचना मनपाला प्राप्त झाली आहे. तारीख निश्चित करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त अमरावती, यांच्याकडे प्रस्ताव पाठविल्या जाईल. त्यावर विभागीय आयुक्तांनी निर्णय घेतल्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल.
*येत्या आठवड्यात महापौरपदाची निवडणूक
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इच्छुकांनी आपापल्या पक्षातील वरिष्ठांकडे ह्यफिल्डिंगह्ण लावली असून, नगरसेवकांनादेखील आश्वस्त केले जात आहे. प्रशासनाकडूनसुद्धा निवडणुकीच्या प्रक्रियेला विलंब होणार नसल्याने येत्या आठवड्यात महापौरपदाचा दावेदार निवडल्या जाण्याची दाट शक्यता आहे.