राज्यातील ६0 हजार शिक्षकांचे आजपासून असहकार आंदोलन
By Admin | Updated: March 10, 2015 02:05 IST2015-03-10T02:05:27+5:302015-03-10T02:05:27+5:30
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात राज्य शासन गंभीर नसल्याचा आरोप.

राज्यातील ६0 हजार शिक्षकांचे आजपासून असहकार आंदोलन
अकोला - राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात राज्य शासन गंभीर नसल्याने तसेच लेखी आश्वासन देऊन आश्वासनांची पूर्तता करण्यात येत नसल्याने राज्यातील सुमारे ६0 हजार कनिष्ठ महाविद्यालयील शिक्षकांनी १0 मार्चपासून विदर्भ ज्युनियर टिचर्स असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या असहकार आंदोलनाद्वारे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उत्तर पत्रिका तपासणीवर असहकार आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, त्यांचे सर्व प्रलंबित प्रश्नांवर तीन महिन्यात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र यावर अद्यापही निर्णय घेण्यात येत नसल्याने विदर्भ ज्युनियर टिचर्स असोसिएशनने असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या शिक्षकांना रोज २५ उत्तरपत्रिका तपासणे आवश्यक आहे; मात्र या असहकार आंदोलनात सदर शिक्षक दिवसातून केवळ २ ते ३ उत्तरपत्रिका तपासणार आहेत. मागील आंदोलनात काढलेल्या शासन आदेशाची अंमलबजावणी करणे, १ नोव्हेंबर २00५ पूर्वी नियुक्त टप्पा अनुदानातील शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, २४ वर्षानंतर विनाअट सरसकट निवडश्रेणी देण्यात यावी, विद्यार्थी हितासाठी ११ वी व १२ वीचे विज्ञान व गणित विषयाचे पेपर पूर्वीप्रमाणे दोन करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी विदर्भ ज्युनियर टिचर्स असोसिएशन व महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.