दुसऱ्या डोससाठी लस मिळेना; लसीकरणाबाबत लाभार्थींमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:14 AM2021-05-03T11:14:39+5:302021-05-03T11:14:46+5:30

Corona Vaccine in Akola : ४५ वर्षांवरील वयोगटातील लाभार्थींनी जावे तरी कुठे? अशी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

No vaccine for second dose; Confusion among beneficiaries about vaccination | दुसऱ्या डोससाठी लस मिळेना; लसीकरणाबाबत लाभार्थींमध्ये संभ्रम

दुसऱ्या डोससाठी लस मिळेना; लसीकरणाबाबत लाभार्थींमध्ये संभ्रम

Next

अकोला : १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे; मात्र लसीचा तुटवडा असल्याने ४५ वर्षांवरील वयोगटातील लाभार्थींची मोठी पंचाईत झाली आहे. सद्य:स्थितीत महापालिका क्षेत्रात केवळ पाच केंद्रांवर लसीकरण सुरू असून, या ठिकाणी केवळ ४५ वर्षांआतील लाभार्थींनाच लस दिली जात आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील वयोगटातील लाभार्थींनी जावे तरी कुठे? अशी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. काहींना पहिला डोस, तर काहींना दुसरा डोस मिळत नसल्याने लाभार्थींची फरपट होताना दिसून येत आहे. आतापर्यंत ४५ वर्षांवरील सर्वांनाच कोविड लसीकरण मोहीम सुरळीत सुरू होती. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या उपलब्धतेनुसार लाभार्थींना पहिला आणि दुसरा डोस सहज मिळणे शक्य होते. दरम्यान, कोव्हॅक्सिनचा पुरवठा न झाल्याने दुसऱ्या डोससाठी लाभार्थींना प्रतीक्षा करावी लागत आहे. अशातच १ मे पासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर महापालिका क्षेत्रात केवळ पाच केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी ४५ वर्षांआतील लाभार्थींच्या लसीकरणास सुरुवात झाल्याने अनेकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. ४५ वर्षांवरील लाभार्थींनी लस घ्यावी तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे कोणाला पहिला डोस, तर कोणाला दुसरा डोस मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी ‘लस देता का कोणी लस?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

आतापर्यंत एकूण लसीकरण - २,०६,६३८

६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील - ७७,८५६

४५ ते ६० वर्षे वयोगटातील - ७५,९७८

३० ते ४५ वयोगटातील - ११,३७३

१८ ते ३० वयोगटातील - ४,७११

 

कोणी काय करायचे

 

 

४५ व ६० वर्षांवरील

प्रत्येकाने पहिल्या किंवा दुसऱ्या डोससाठी कोविनच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी, संकेतस्थळावर ४५ वर्षांवरील वयोगटातील लाभार्थींसाठी उपलब्ध लसीकरण केंद्राची यादी दिसेल. त्यातील केंद्र निवडून ठरावीक दिवसाची वेळ निश्चित करून घ्यावी. त्यानुसार निश्चित दिवशी व वेळेत निवडलेल्या केंद्रावर जावे.

१८ वर्षांवरील लस घेतलेले नागरिक

लस घेतल्यानंतर काही वेळ आराम करावा. थकवा किंवा ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावा. आतापर्यंत कोणाला ताप आल्याचे चित्र दिसून आले नाही.

 

कुठल्याही वयोगटातील असो, लाभार्थींनी पहिल्या तसेच दुसऱ्या डोससाठी कोविन संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नाेंदणी करावी. त्यानंतर लसीकरण केंद्र निवडावे, तसेच दिवस व वेळ निवडावे. शेड्युल्ड बुक झाल्यानंतरच लाभार्थींना सहज लस मिळणे शक्य होईल.

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला

Web Title: No vaccine for second dose; Confusion among beneficiaries about vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.