No rain...Farmers in trouble | सांगा कसं जगायचं... खारपाणपट्ट्यात भीषण परिस्थिती 
सांगा कसं जगायचं... खारपाणपट्ट्यात भीषण परिस्थिती 

- नितीन गव्हाळे
अकोला: दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती, कर्जाचा डोंगर काही केल्या कमी होईना. यंदाचे साल तरी सुखाचे जाईल, अशी अपेक्षा असताना निसर्गाने शेतकºयांचा घात केला. हजारो रुपयांची बी-बियाणे, खते घेतली; परंतु पाऊस आलाच नाही. खरेदी केलेले बी-बियाणे, खते घरातच पडून आहेत. जमीन पेरण्याचेही काम पडले नाही. ज्या शेतकºयांनी शेतात पेरणी केली, त्यांचेही पीक हातून निसटून गेले. आता पाऊस येऊनही फायद्याचा नाही. त्यामुळे सांगा कसं जगायचं...,असा सवाल शेतकºयांनी शासनाला केला आहे.
‘लोकमत’ चमूने मंगळवारी खारपाणपट्ट्यातील गावांमधील पीक परिस्थितीचा आढावा घेतला असता, वेदनादायी वास्तव पुढे आले. खारपाणपट्ट्यातील गावांमध्ये पावसाचा एक टिपूसदेखील नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या भागातील गावांमध्ये स्मशान शांतता पसरली असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पेरणीच नसल्यामुळे शेतकरी, शेतमजुराच्या हाताला कामच उरले नाही. पाऊस नाही. पेरणी नाही तर जगायचं कसं, मुलांचे शिक्षण कसे करायचे, दैनंदिन व्यवहारासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा, घरखर्च कसा चालवायचा, आदी प्रश्न शेतकºयांच्या डोक्यात थैमान घालत आहेत. दोन वर्षांपासून खारपाणपट्ट्यातील शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यंदासुद्धा शेतकºयांवर दुष्काळसदृश स्थिती ओढवली आहे. आपातापा, एकलारा, बंधुगोटा, कपिलेश्वर, वडद, काटी-पाटी, दोनवाडा, एकलारा, अंबिकापूर, गोणापूर, दापुरा, मजलापूर, कट्यार, म्हैसांग आदी गावांमध्ये पावसाचा एकही थेंब पडला नसल्यामुळे शेतकºयांनी जमीनच पेरली नसल्याचे चित्र दिसून येते. काही भागात पेरणी आटोपली असून, पावसाअभावी मूग, सोयाबीन, तूर, कपाशीच्या पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. पाऊस नसल्यामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटली असून, तीव्र उन्हामुळे पिके सुकत आहेत. यंदा तर शेतकºयांवर अस्मानी संकट कोसळले असून, या संकटातून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी शासनाने सर्वेक्षण करून शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.

मूग, सोयाबीन गेले, तूर, कपाशीचे पीकही जाणार!
आपातापा, अंबिकापूर, दापूर, गोणापूर, मजलापूर, कट्यार, म्हैसांग आदी भागात पाऊसच न पडल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरणीच केली नाही. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु पावसाअभावी मूग, सोयाबीनचे पीक गेले. आता तूर, कपाशीचे पीकही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


पीक जगविण्यासाठी ‘स्प्रिंकलर’ने पाणी!
ज्या शेतकºयांनी मूग, सोयाबीन, तूर, कपाशीची लागवड केली, ते शेतकरी पीक जगविण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. पावसाची चिन्हे दिसत नसल्याने, पीक जगविण्यासाठी शेतकरी पूर्णा नदीतून, बोअरचे स्प्रिंकलर पाइपने पाणी देत आहेत. आज, उद्या पाऊस येईलच, अशी आशा असल्याने, अनेक शेतकºयांनी स्प्रिंकलरने शेतात पाणी देणे सुरू केले आहे.


खारपाणपट्ट्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
खारपाणपट्ट्यातील अनेक गावांमध्ये पाऊस झाला नसल्यामुळे शेतांमध्ये पेरणीच केली नसल्याचे विदारक चित्र आहे. काळेभोर शेत दृष्टीत पडत असून, शेतकºयांचे बी-बियाणे, खतेसुद्धा वाया गेले आहेत. ज्यांनी पेरणी केली, त्या शेतकºयांच्या पेरण्या उलटल्या आहेत. त्यामुळे शासनाने या गावांमधील सर्व्हे करून दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळ निवारण करण्यासाठी उपाययोजना करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.

 


Web Title: No rain...Farmers in trouble
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.