अकोला मनपात मुख्य लेखा परीक्षकच नाहीत; कारभार रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 14:55 IST2020-03-03T14:54:57+5:302020-03-03T14:55:08+5:30
मुख्य लेखा परीक्षकांच्या मंजुरीअभावी विविध विभागाच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील फायली अडकून पडल्याची माहिती आहे.

अकोला मनपात मुख्य लेखा परीक्षकच नाहीत; कारभार रामभरोसे
अकोला : महापालिकेचे प्रभारी मुख्य लेखा परीक्षक जे.एस. मानमोठे यांची हिंगोली येथे बदली झाल्यामुळे मनपाची प्रशासकीय घडी विस्कटल्याचे समोर आले आहे. मुख्य लेखा परीक्षकांच्या मंजुरीअभावी विविध विभागाच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील फायली अडकून पडल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेत कार्यरत मुख्य लेखा परीक्षक जे.एस. मानमोठे यांच्याकडे महापालिकेचा प्रभार सोपविण्यात आला होता. तत्पूर्वी मानमोठे मनपामध्येच या पदावर नियुक्त होते. यादरम्यान, मानमोठे यांची हिंगोली येथे बदली झाली. त्याचा परिणाम मनपाच्या आर्थिक व्यवहारांवर झाला आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून प्रशासनाचे सर्व आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले आहेत. विविध विभागातील महत्त्वाच्या फायलींना मुख्य लेखापरीक्षकांची मंजुरी क्रमप्राप्त असताना सदर फायली रखडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना विचारणा केली असता, मुख्य लेखा परीक्षकांच्या रिक्त पदाविषयी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना अवगत केल्याची माहिती त्यांनी दिली. मनपातील सदर पदावर वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती होते की जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाºयाकडे अतिरिक्त प्रभार दिला जातो, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.