एनएचएम कर्मचाऱ्यांनी काढली शासनाची प्रतिकात्मक तिरडी
By सचिन राऊत | Updated: November 4, 2023 18:10 IST2023-11-04T17:53:38+5:302023-11-04T18:10:08+5:30
१० दिवसांपासून अधिकारी- कर्मचारी आंदाेलन करीत असताना शासन दखल घेत नसल्याने यावेळी काही कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदाेलनही केले.

एनएचएम कर्मचाऱ्यांनी काढली शासनाची प्रतिकात्मक तिरडी
अकोला : शासनाच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर गत दहा दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले असून, या आंदाेलनस्थळी शासनाची प्रतीकात्मक तिरडी काढून निषेध करण्यात आला. १० दिवसांपासून अधिकारी- कर्मचारी आंदाेलन करीत असताना शासन दखल घेत नसल्याने यावेळी काही कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदाेलनही केले. या आंदोलनात ८०० पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी- कर्मचारी सहभागी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी परिचारिका, जीएनएम एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व एनएचएमअंतर्गत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिक्तपदांवर समायोजन करण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. याची दखल न घेतल्याने २५ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत कृती समितीने घोषणा दिल्या व आंदोलन केले. त्यानंतर शासनाची प्रतीकात्मक तिरडी काढून निषेध करण्यात आला. १० दिवसांपासून अधिकारी, कर्मचारी आंदाेलन करीत असताना शासन दखल घेत नसल्याने यावेळी काही कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदाेलनही केले. यावेळी राष्ट्रीय आराेग्य अभियानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या आंदाेलनाला आराेग्य संस्थांचा पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात आले.