‘नेट कनेक्टिव्हिटी’मध्ये अडकला ‘आॅनलाइन’ सातबारा!
By Admin | Updated: July 15, 2017 01:37 IST2017-07-15T01:37:56+5:302017-07-15T01:37:56+5:30
शेतकऱ्यांना हेलपाटे : त्रुटी दुरुस्तीचे काम ९९ टक्क्यांवर

‘नेट कनेक्टिव्हिटी’मध्ये अडकला ‘आॅनलाइन’ सातबारा!
संतोष येलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात शेतकऱ्यांना ‘आॅनलाइन’ सात-बाराचे वितरण करण्यात येत आहे. आॅनलाइन झालेल्या सात-बारामधील त्रुटी दुरुस्तीचे कामही ९९ टक्के पूर्ण करण्यात आले; मात्र ग्रामीण भागात ‘नेट कनेक्टिव्हिटी’च्या अभावात आॅनलाइन सात-बारा वितरणात अडचणी निर्माण होत असल्याने, सात-बारा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे सहन करावे लागत आहेत. त्यामुळे सात-बारा ‘आॅनलाइन’ झाला; पण ‘नेट कनेक्टिव्हिटी’मध्ये अडकल्याचा प्रत्यय येत आहे.
जिल्ह्यातील हस्तलिखित सात-बाराचे वितरण गत २०१२ पासून बंद करण्यात आले असून, २०१३ पासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘आॅनलाइन’ पद्धतीने सात-बारा देण्याचे काम सुरू करण्यात आले. अद्ययावत आॅनलाइन सात-बारा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी संगणकीकृत करण्यात आलेल्या ३ लाख ५३ हजार ८०३ सात-बारामधील चुका, त्रुटी दुरुस्तीचे महसूल विभागाकडून सुरू करण्यात आलेले काम १० जुलैपर्यंत ९९.२७ टक्के पूर्ण करण्यात आले.
शेतकऱ्यांना आॅनलाइन सात-बारा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यात महसूल मंडळाच्या ठिकाणी ५० ठिकाणी ‘वर्क स्टेशन’ सुरू करण्यात आले; परंतु ग्रामीण भागात सातत्याने निर्माण होणारा ‘नेट कनेक्टिव्हिटी’चा अभाव आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना तातडीने आॅनलाइन सात-बारा उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
वेळेवर सात-बारा मिळत नसल्याने, आॅनलाइन सात-बारा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे चकरा माराव्या लागत असून, नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत. त्यानुषंगाने सात-बारा आॅनलाइन झाला तरी, नेट कनेक्टिव्हिटीमध्ये अडकल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे.
आॅनलाइन सात-बारा वितरणातील अशा आहेत अडचणी!
ग्रामीण भागात आॅनलाइन सात-बारा वितरणात अनेक अडचणी येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, वेबसाइट उघडण्यासाठी पासवर्ड कधी लॉगिंग होतो कधी होत नाही. नेट कनेक्टिव्हिटीअभावी वारंवार वेबसाइट बंद पडणे अशा अनेक अडचणी आॅनलाइन सात-बारा वितरणात निर्माण होत असल्याने, शेतकऱ्यांना आॅनलाइन सात-बारा मिळविण्यासाठी विलंब सहन करावा लागत आहे.
आॅनलाइन सात-बारा वितरणाचे असे आहेत ‘वर्क स्टेशन’!
जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आॅनलाइन सात-बारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यात ५० ‘वर्क स्टेशन’ सुरू करण्यात आले. या वर्क स्टेशनमध्ये संबंधित तलाठ्यांकडून शेतकऱ्यांना आॅनलाइन सात-बाराचे वितरण केले जाते. त्यामध्ये अकोला-१०, अकोट-८, तेल्हारा -६, बाळापूर-७, पातूर -५, मूर्तिजापूर -८ आणि बार्शीटाकळी तालुक्यातील ६ वर्क स्टेशनचा समावेश आहे.