नेहरू पार्क ते तुकाराम चौक रस्ता अर्धवट होणार!
By Admin | Updated: February 2, 2016 01:59 IST2016-02-02T01:59:22+5:302016-02-02T01:59:22+5:30
‘पीडब्ल्यूडी’च्या मनमानीवर लोकप्रतिनिधींची चुप्पी!

नेहरू पार्क ते तुकाराम चौक रस्ता अर्धवट होणार!
अकोला: लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला मंजूर झालेल्या २0 कोटींच्या कामांची या विभागाकडून ऐसीतैशी केली जात आहे. नेहरू पार्क ते तुकाराम चौक रस्त्यासाठी नऊ कोटींची तरतूद करण्यात आली असून, पीडब्ल्यूडीने तयार केलेल्या निविदेनुसार, हा रस्ता २ हजार ८00 मीटर ऐवजी केवळ १३00 मीटर लांबीचा होणार आहे. पीडब्ल्यूडीच्या मनमानीवर लोकप्रतिनिधींनी चुप्पी साधली आहे. मनपा क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने १५ कोटींचा निधी दिला. या निधीतून १२ डांबरी, तर काँक्रिटच्या सहा रस्त्यांचे निर्माण करण्याचा निर्णय मनपाने घेतला. याव्यतिरिक्त शहरातील इतर प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली असता, २0 कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत २0 कोटींमधून रस्ते दुरुस्तीची कामे होणार असली तरी या विभागाकडून दिरंगाई होत असल्याचा आक्षेप घेत, ही कामे मनपा प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लावून धरली होती. नेहरू पार्क ते तुकाराम चौकापर्यंंत डांबरी रस्त्यासाठी नऊ कोटींची तरतूद करण्यात आली. या रस्त्याचे काम मनपाकडे सोपविण्याचा त्यामध्ये समावेश होता. दरम्यान, हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली आणि पीडब्ल्यूडीने घाईघाईत २0 कोटींच्या कामाची निविदा प्रकाशित केली. या निविदेत नेहरू पार्क ते तुकाराम चौक या २ हजार ८00 मीटर लांबीच्या रस्त्यातील १३00 मीटर लांबीच्या रस्त्याचेच काम होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी जे निकष वापरले जातात, त्यानुसार हा रस्ता तब्बल ५00 मिमी जाडीचा केला जाईल. पीडब्ल्यूडीने रस्त्याची जाडी वाढवल्याने लांबी कमी झाली. असाच प्रकार अशोक वाटिका ते सरकारी बगीचा या रस्त्याबाबतही झाला आहे.