नेहाच्या ऑलिम्पिकवारीत आर्थिक अडचणींचे काटे!
By Admin | Updated: February 18, 2015 02:06 IST2015-02-18T02:06:18+5:302015-02-18T02:06:18+5:30
लोकमत मदतीचा हात; उच्चस्तरीय प्रशिक्षणाअभावी संधी देऊ शकते हुलकावणी.
नेहाच्या ऑलिम्पिकवारीत आर्थिक अडचणींचे काटे!
अकोला : केवळ राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेतच नव्हे, तर सातासमुद्रापार अकोल्याचे नाव बॉक्सिंगच्या नकाशावर झळकविणार्या नेहा अनिल रोठेला आगामी काळात आशियाडसह विश्व चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली आहे. भारतीय महिला संघात तिला स्थान मिळाले आहे; मात्र तिच्या या प्रगतीच्या वाट्यात आर्थिक अडचणींचे काटे उभे ठाकल्याने तिची प्रगतीची वाट खुंटण्याची शक्यता आहे.
बॉक्सिंग या खेळात कधीकाळी केवळ पुरुषांची मक्तेदारी होती. ती मोडून काढत मेरी कोमने भारतीय महिलांना बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याची प्रेरणा दिली. तिच्या पावलांवर पाऊल ठेवत अकोला जिल्ह्यातील अनेक मुलींनी बॉक्सिंग या खेळात कारकीर्द घडविण्यासाठी परिश्रम घेतले. त्यातूनच नेहा अनिल रोठे ही पुढे आली. एक पोलीस कर्मचार्याची मुलगी असलेली नेहा केवळ बॉक्सिंग या खेळावर प्रभुत्व मिळवूनच थांबली नाही, तर २0११ पासून तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तिने महिलांच्या ८१ किलोपेक्षा अधिक वजनाच्या सुपर हेविवेट गटात सलग सहा वर्षे सुवर्णपदकाची कमाई केली. २0१२ मध्ये तिने राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर तिच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावतच राहिला. सर्बियामध्ये झालेल्या गोल्डन ग्लोबल आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेतही ती कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. तिच्या उंचावणार्या कामगिरीचा आलेख बघून तिला भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाले.
२0१६ मध्ये आशिया स्पर्धा, २0१८ मध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धा आणि २0२0 मध्ये होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिला आता तयारी करावी लागणार आहे. या स्पर्धांचा आंतरराष्ट्रीय दर्जा लक्षात घेता, तिला आता उच्चस्तरीय प्रशिक्षणाची आवश्यकता भासणार आहे. हे प्रशिक्षण अकोल्यात उपलब्ध नसल्याने मुंबई आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये जाऊन तिला प्रशिक्षण घ्यावे लागेल. या प्रशिक्षणावर महिन्याला ६0 ते ७0 हजार रुपये खर्च होतो. हे प्रशिक्षण पूर्ण न केल्यास तिला भारतीय संघातील स्थानही डळमळीत होऊ शकते. या प्रशिक्षणाचा खर्च भागविण्याची क्षमता पोलीस कर्मचारी असलेल्या पित्याच्या क्षमतेबाहेर आहे. यावर्षी याच प्रशिक्षणाअभावी तिची भारतीय संघाकडून खेळण्याची एक संधी हुकली. यापुढे प्रशिक्षण पूर्ण न केल्यास अकोल्यातील एका तरुणीला ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यापासून वंचित राहावे लागू शकते.