तरूणांनी स्वयंरोजगारातून विकास साधण्याची गरज

By Admin | Updated: January 14, 2015 23:32 IST2015-01-14T23:32:59+5:302015-01-14T23:32:59+5:30

ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे राज्य समन्वयक व्ही.एम.पोतदार यांचे आवाहन.

The need for youth to develop from self-employment | तरूणांनी स्वयंरोजगारातून विकास साधण्याची गरज

तरूणांनी स्वयंरोजगारातून विकास साधण्याची गरज

बुलडाणा : ग्रामिण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था सर्वार्थाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी संस्था आहे. विनामुल्य प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल, बँकांकडून भांडवलासाठी पाठपुरावा, तसेच प्रशिक्षणार्थ्याला दोन वर्ष विनामुल्य मार्गदर्शन अशा स्वरूपात अन्य कोणलीही संस्था मदत करीत नाही. केंद्र सरकारचा हा उपक्रम असून, या संधीचा लाभ घेऊन आपणच आपला रोजगार निर्माण करण्याची वेळ आली आहे, असे मत ग्रामिण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे राज्य समन्वयक व्ही.एम.पोतदार यांनी लोकमत शी बोलतांना व्यक्त केले.

*प्रश्न : ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेची रचना कशी आहे ?
ग्रामिण विकास व स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था असे या संस्थेचे नाव असून, ही संस्था केंद्र सरकार, राज्य सरकार व बँकांच्या मदतीने चालते. राज्यात ३५ ठिकाणी संस्थेची कार्यालये असून, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १ कोटी रूपये खचरून संस्थेचे अद्ययावत असे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची योजना आहे. ठाणे, लातूर, जळगाव येथील इमारती पूर्णत्वास गेल्या असून, इतर जिल्ह्यामध्ये जागा उपलब्ध होताच प्रशिक्षण केंद्राच्या वास्तू तयार होतील. या केंद्रामध्ये बेरोजगार तरूणांना विविध व्यवसायांचे विनामुल्य प्रशिक्षण दिले जाते, तसेच त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उभारणीसाठी बँकांकडे पाठपुरावा केला जातो.

*प्रश्न : प्रशिक्षणाचे स्वरूप कसे असते?
आमच्या संस्थेद्वारा तब्बल १७८ प्रकारच्या प्रशिक्षणांची व्यवस्था केली आहे. यामध्ये शेती तसेच शेतीपूरक व्यवसायांची संख्या ४५ आहे. ज्या भागामध्ये प्रशिक्षण आयोजित करायचे आहे, त्या परिसराची गरज काय, याचाही विचार करून प्रशिक्षणामध्ये बदल केला जातो

प्रश्न : प्रशिक्षण शिबिराचे संचालन कसे होते?
दारिद्रय रेषेखालील कोणतीही व्यक्ती या शिबिरामध्ये सहभागी होऊ शकते. संपूर्ण विनामुल्य तसेच निवासी स्वरूपाचे हे शिबीर असते. शिबिरामध्ये परिसरातील तज्ज्ञ व्यक्ती व्यवसायाचे स्वरूप पाहून आठ दिवसांपासून तर महिनाभरापर्यंत प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय ज्ञानासोबतच व्यक्तीमत्व विकास, क्षमता बांधणी यांचाही विचार केला जातो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबधिताला व्यवसाय करण्यासाठी बँकांकडे पाठपुरावा करणे, तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी संस्था मदत करते. विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांचा दोन वर्ष पाठपुरावा घेत असतो, त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला, याचे समाधान आहे.

प्रश्न : आतापर्यत किती लोकांना रोजगार दिला?
संस्थेमार्फत राज्यात आतापर्यंत ७ लाख ४५ हजार तरूण-तरूणींना प्रशिक्षण दिले असून, त्यापैकी ४ लाख ४२ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. बुलडाण्याचा विचार केला, तर येथील केंद्र संचालक पी.एन.सावजी व संयोजन प्रमुख चंद्रशेखर केणे यांनी गेल्या वर्षभरात २१ प्रशिक्षण शिबिरे घेतली. यातून ४३0 लोकांना प्रशिक्षण दिले व त्यापैकी १४५ लोक बँकांच्या मदतीने रोजगार उभारू शकले आहेत.

प्रश्न : अशा प्रशिक्षण शिबिरांकडे लोकांचा कल आहे का?
दूदैवाने हवा तसा नाही ! अजूनही तरूणांना सरकारी नोकरीची अपेक्षा आहे. आमचे प्रशिक्षण हे विनामुल्य आहे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, लिड बँका यांच्या मदतीने आम्ही रोजगाराच्या दारापर्यंत तरूणांना नेतो. जातीची, शिक्षणाची कोणतीही अट नाही. त्यामुळे प्रकल्पासंदर्भात जागृती निर्माण करून तरूणांना त्यांच्यामधील क्षमतेची जाणीव करून दिली पाहिजे.

Web Title: The need for youth to develop from self-employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.