राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीचे संकेत!
By Admin | Updated: September 29, 2014 01:47 IST2014-09-29T01:47:59+5:302014-09-29T01:47:59+5:30
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याची चर्चा.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीचे संकेत!
अकोला : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी संपुष्टात आल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हय़ातील पाचही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले असून, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याची चर्चा असल्याने, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड खोरी होण्याचे संकेत आहेत. या दोन्ही पक्षाच्या आघाडीत जिल्हय़ातील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला होता. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीने निवडणुकांची घोषणा होण्याआधीच या मतदारसंघात जय्यत तयारी सुरू केली होती. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा, याकरिता जिल्हय़ातील राष्ट्रवादीच्या दिग्गज ने त्यांनी शरद पवार यांना साकडे घातले होते; परंतु आघाडीच तुटल्याने, या दोन्ही पक्षांनी जिल्हय़ातील पाचही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे अकोला पूर्व या म तदारसंघात एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. आकोट विधानसभा मतदारसंघात दोघांच्या नावाची चर्चा होती; परंतु या मतदारसंघात एका नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले. बाळापूर व अकोला पश्चिम या मतदारसंघात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने वेळेवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मूर्तिजापूर मतदारसंघात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या २0 पदाधिकार्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केले होते. यातील एका उमेदवाराला उमेदवारी मिळाली आहे. यामुळे पक्षांच्या निष्ठावान नेत्यांची निराशा झाल्याची चर्चा असून, या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. याच मतदारसंघात चार उमेदवारांनी पक्षाच्या नावाने अर्ज दाखल केले असून, जिल्हय़ातील इतरही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत; परंतु पक्ष ज्यांना एबी अर्ज देतील ते उमेदवार अधिकृत असतील, इतरांचे अर्ज मात्र बाद होणार असल्याने पक्षाला चिंता नाही. मूर्तिजापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या तथा जिल्हा परिदष सदस्या प्रतिभा अवचार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.