नवरात्र व्याख्यानमाला : दहशतवादी हल्ले भारतीय संस्कृतीला कलंक -फ्रान्सिस दिब्रिटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 13:13 IST2018-10-23T13:12:42+5:302018-10-23T13:13:12+5:30
अलीकडच्या काळात अल्पसंख्याकांच्या हत्या झाल्या आहेत. ही हिंसा धर्मापुरती नाही राहिली. ती विचारवंतापर्यंत आली आहे. विचारांचे बळी पण गेले आहेत. दाभोळकर, पानसरेंच्या रू पात विचारांचे बळी गेले आहेत, असे प्रखर विचार वसई येथील वक्ता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले.

नवरात्र व्याख्यानमाला : दहशतवादी हल्ले भारतीय संस्कृतीला कलंक -फ्रान्सिस दिब्रिटो
अकोला: हिंसेचे विशाल रू प म्हणजे दहशतवादी हल्ले. दहशतवादी हल्ले हे भारतीय संस्कृतीला कलंक आहेत. अलीकडच्या काळात अल्पसंख्याकांच्या हत्या झाल्या आहेत. ही हिंसा धर्मापुरती नाही राहिली. ती विचारवंतापर्यंत आली आहे. विचारांचे बळी पण गेले आहेत. दाभोळकर, पानसरेंच्या रू पात विचारांचे बळी गेले आहेत, असे प्रखर विचार वसई येथील वक्ता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले.
बाबूजी देशमुख वाचनालयाच्या वतीने आयोजित नवरात्री व्याख्यानमाला प्रमिलाताई ओक सभागृह येथे सुरू आहे. सोमवारी तिसरे पुष्प गुंफताना फादर फ्रान्सिस दिब्रिटो ‘बलशाली भारत होवो’ या विषयावर बोलत होते. फादर दिब्रिटो पुढे म्हणाले, भयगंड ही मानसिक समस्या आहे. विचारवंतांनी यावर वस्तुनिष्ठ चिंतन करणे आवश्यक आहे. ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ आपल्याकडे अशी म्हण आहे. कारण भीतीपोटी संशय निर्माण होतो. संशयातून द्वेष आणि या द्वेषातूनच हिंसा घडते. पहिल्या हिंसेमध्येच दुसऱ्या हिंसेचे बीज पेरल्या जाते. हिंसा ही आपल्याच देशात घडते, असे नाही. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातदेखील वांशिक द्वेष होता. या द्वेषातूनच हत्या झाल्या आहेत. लिब्रो लोकांना झुंडीने ठार मारण्यात आले. माणसाला माणसांनी झुंडीने ठार केले आहे. जागतिक आकड्यानुसार आतापर्यंत २,०५७ झुंडीने हत्या जगात झाल्या आहेत. या झुंड हत्येचे विशाल रू प म्हणजे आजचे दहशतवादी हल्ले.
निवडणुका लोकशाहीत आवश्यक आहे; परंतु सत्ता संपादन करण्यासाठी धर्माचा वापर होत असेल तर तो गैर आहे. यावर राजकीय पक्षातील नेत्यांनी विचार करणे गरजेचे आहे, असेही दिब्रिटो म्हणाले. आर्थिक महासत्तेत शोषण आहे. शोषण होणारी महासत्ता आपल्याला निर्माण करायची नाही. शेतकºयांना आत्महत्या का कराव्या लागतात, याचा सखोल विचार कोणी करीत नाही. शेतकºयांच्या आत्महत्यांमागे मल्टी नॅशनल कंपन्या असल्याचा आरोप दिब्रिटो यांनी केला. जगाला मोठी बाजारपेठ भारत मिळाली आहे. त्यांचे प्रेम भारतावर नाही. भारताच्या पैशांवर आहे. अशाने बलशाली भारत कसा निर्माण होईल, याचा विचार विचारवंतानी केला पाहिजे. आज अध्यात्मिक महासत्ता निर्माण करण्याची गरज आहे. एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती हा जगण्याचा आणि टिकून राहण्याचा एकमेव मंत्र आहे. एकता राहिली तरच बलशाली भारत निर्माण होईल, असे दिब्रिटो म्हणाले.