नवोदय विद्यालयातील ‘तो’ विद्यार्थी भुसावळमध्ये सापडला!
By Admin | Updated: January 20, 2015 01:00 IST2015-01-20T01:00:04+5:302015-01-20T01:00:04+5:30
प्राचार्यांनी दिली होती अपहरणाची तक्रार.

नवोदय विद्यालयातील ‘तो’ विद्यार्थी भुसावळमध्ये सापडला!
अकोला: बाभूळगाव जहाँगीर येथील नवोदय विद्यालयातील १७ वर्षीय विद्यार्थ्याचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजतानंतर घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला; परंतु हा विद्यार्थी सोमवारी रात्री भुसावळ शहरात सापडला असून, तो सुखरूप असल्याची माहिती नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर.ए. सिंह यांनी दिली. नवोदय विद्यालयाचे प्राचार्य रामवतार तपेश्वर सिंह (४२) यांनी सोमवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार देऊन त्यांच्या विद्यालयातील इयत्ता ११ वीमध्ये शिकणारा विद्यार्थी सचिन श्रीकृष्ण वासनिक (१७) याला रविवारी रात्री ११ वाजतानंतर वसतिगृहातून कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले होते. यासंदर्भात प्राचार्य सिंह यांनी वासनिक याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली होती. रामवतार सिंह यांच्या तक्रारीनुसार, सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला; परंतु सचिन वासनिक हा भुसावळमध्ये सापडला असून, त्याचे कोणीही अपहरण केले नाही. त्याच्यासोबत संपर्क झाला असून, त्याने आपण मर्जीने मित्रांसोबत गेल्याचे स्पष्ट केले. सचिनला सध्या भुसावळ शहरातील नवोदय विद्यालयामध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य सिंह यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. त्याचे पालक भुसावळला रवाना झाले असून, सचिन वासनिक हा अकोल्यात आल्यानंतरच तो कुठे आणि कोणासोबत गेला होता, हे स्पष्ट होईल.