केंद्र शासन राबविणार ‘राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान’
By Admin | Updated: November 11, 2014 23:38 IST2014-11-11T23:38:34+5:302014-11-11T23:38:34+5:30
उच्च शिक्षणात १८ योजना होणार कार्यान्वित.

केंद्र शासन राबविणार ‘राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान’
अकोला : देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढावी आणि अधिकाधिक लोकांना उच्च शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र शासनाने बाराव्या व तेराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत ह्यराष्ट्रीय उच्च स्तर शिक्षण अभियान मोहीमह्ण राबविण्याचे निश्चित केले आहे. या अभियानांतर्गत एकूण १८ योजना कार्यान्वित होणार आहेत. या संदर्भात विद्यापीठ स्तरावर समिती स्थापन करण्यात आली असून, अहवाल तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. समाजातील सर्व घटकांपर्यंत उच्च शिक्षणाची संधी पोहचविणे, उच्च शिक्षण सर्व समावेशक करणे आणि उच्चतम गुणवत्ता साधणे, ही उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून, केंद्र शासनाने बाराव्या व तेराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षण अभियान मोहीम हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत विद्यापीठे व महाविद्यालयांना उच्च शिक्षणाचे विविध अभ्यासक्रम राबविण्यासाठी, तसेच भौतिक सुविधांसाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी एकूण १८ योजना कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या संदर्भात केंद्र शासनाने सर्व राज्यांच्या शिक्षण विभागाला सूचना केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाच्या वतीने राज्यातील सर्व विद्यापीठांना या योजनेंतर्गत निधी प्राप्त होण्यासाठी तात्काळ प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यापीठांनी त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांना पत्र पाठविली आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने देखील सर्व अधिनस्थ महाविद्यालयांना पत्रे पाठविली आहेत. विद्यापीठाने यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या शिफारसीवरुन एक समिती गठित केली आहे. ही समिती अहवाल तयार करीत असून, लवकरच हा अहवाल शिक्षण संचालनालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे अमरावती विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक अजय देशमुख यांनी सांगीतले.