नरसिंग महाराज पालखी सोहळा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:51 AM2020-06-30T11:51:03+5:302020-06-30T11:51:41+5:30

गत ३५ वर्षांपासून पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला जाणारी नरसिंग महाराजाची पालखी यावर्षी खंडित झाली आहे.

Narsingh Maharaj palanquin ceremony not this year | नरसिंग महाराज पालखी सोहळा खंडित

नरसिंग महाराज पालखी सोहळा खंडित

googlenewsNext

- विजय शिंदे 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : गत ३५ वर्षांपासून पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला जाणारी नरसिंग महाराजाची पालखी यावर्षी खंडित झाली आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट (जळगाव नहाटे) येथील नरसिंग महाराज हे उपजत ज्ञानी, गीतोक्त १८ ज्ञानलक्षणे व २६ दैवी संपत्तीयुक्त, स्थितप्रज्ञ, महासिद्ध योगी होते. लहानपणापासूनच पांडुरंगाच्या भक्तीत वेडे असलेले नरसिंग महाराज भक्तांना एका क्षणात पंढरीस नेत. शेतात जनावरे चारत असताना सोबत्यांना गुरे सांभाळण्यास सांगून पंढरपूरवरून काल्याचा प्रसाद घेऊन येत, असे नरसिंग महाराज लीलामृत ग्रंथात नमूद आहे. एकदा आषाढी एकादशीच्या वेळेला नरसिंग महाराज हे आपले परमभक्त गणोबा नाईक यांच्या सोबत पंढरपूरला गेले होते. त्या ठिकाणी मंदिरात एका नास्तिकाने पांडुरंगाची मूर्ती नष्ट करण्याच्या उद्देशाने गरूड खांबापासून एक लोखंडी गोळा पांडुरंगाच्या दिशेने फेकून मारला; परंतु चुकून तो गोळा पांडुरंगाच्या पायावर पडल्याने त्यामधून भळाभळा रक्त वाहू लागले. पांडुरंगाच्या पायाला जखम झाल्याने वारकरी मंडळीत घबराट व कुतूहल निर्माण झाले. वारकरी रडू लागले. ही घटना नरसिंग महाराज यांना कळताच त्यांनी मंदिरात धाव घेऊन वारकऱ्यांना देव अभंग आहे, तो कसा भंगेल, असे सांगून आपण पांडुरंगाच्या पायाला औषधपट्टी लावू, तो बरा होईल, असे सांगू लागले; परंतु नरसिंग महाराजांच्या अंगावरील नुसती लंगोटी व गळ्यातील फेट्याची चिंधी पाहून वारकरी भक्तांनी त्यांना वेड्यात काढले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागले; परंतु नरसिंग महाराजांनी पांडुरंगाच्या पायावर तुळशी बुक्का लावून पट्टी बांधून जखम बरी होण्यासाठी प्रार्थना केली आणि क्षणात पायातील रक्ताची धार बंद होऊन जखम बरी झाली, अशी अख््यायिका आहेत. विशेष म्हणजे याबाबतचा उल्लेख १८७० च्या शासकीय गॅझेटिअरमध्ये नमूद आहे. त्यामुळे अकोट परिसरातील विठ्ठलाचा वैद्य म्हणून नरसिंग महाराज यांचा उल्लेख केल्या जातो.
या प्रसंगाची नोंद १८७० च्या शासकीय गॅझेटिअर व १९१० मध्ये प्रकाशित झालेल्या जुन्या अकोला डिस्ट्रिक्ट गॅझेटिअरमध्ये आहे. तसेच संत वासुदेव महाराज यांनी लिहिलेल्या नरसिंग महाराज लीलामृत व ज्ञानेशप्रसाद लिखित श्री वासुदेव ज्ञानामृतमध्ये या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. अकोट येथील मंदिरात पांडुरंग-रुखमाईच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराच्या बांधकामाची सुरुवात नरसिंग महाराजांच्या हस्ते झाली. पुढे त्याच ठिकाणी संतश्रेष्ठ नरसिंग महाराजांनी समाधी घेतली. यावेळी खुद्द संतश्रेष्ठ गजानन महाराज उपस्थित होते. आजही पांडुरंग-रुखमाई मूर्तीची व त्यापुढील महाराजांच्या समाधीचे पूजन, दर्शन घेण्यासाठी माहिती असलेलेच वारकरी पंढरपूरची वारी म्हणून आषाढी एकादशीला नरसिंग मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिराचे व्यवस्थापक स्व. गुणवंत आसरकर यांनी १९८५ साली नरसिंग महाराज पालखी पायदळ वारी सोहळा सुरू केला. ३५ वर्षांपासून अखंडपणे ही वारी सुरू आहे. यावर्षी कोरोना महामारीमुळे पालखीची वारी खंडित झाली, त्यामुळे संस्थेचे विश्वस्त सतीश आसरकर व इतर भक्त मंदिरात शासनाचे नियमाचे पालन करीत पूजाअर्चा व गोपालकाला करून हा वारी सोहळा पार पाडणार आहे.

Web Title: Narsingh Maharaj palanquin ceremony not this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.