नरेश भुतडासह चौघांना अटक; जामीन अर्ज मंजूर
By Admin | Updated: March 21, 2016 01:59 IST2016-03-21T01:59:42+5:302016-03-21T01:59:42+5:30
शनिवारी छापा टाकून नरेश भुतडासह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल.

नरेश भुतडासह चौघांना अटक; जामीन अर्ज मंजूर
आकोट: येथील क्रिकेट सट्टय़ावर पोलिसांनी शनिवारी छापा टाकून नरेश भुतडासह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. टी-२0 विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत- पाकिस्तानदरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यावर सट्टय़ाची खायवाडी सुरू होती. आकोट एमआयडीसी परिसरातील भुतडाच्या अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने १९ मार्च रोजी रात्री छापा टाकला होता. पोलिसांनी रोख रकमेसह साहित्य, वाहने जप्त केली होती.
लोहारी मार्गावरील योगीराज ऑइल मिल या ठिकाणी भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षकांच्या पथकाला सोबत घेऊन परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी धाड टाकली. यावेळी आरोपी नरेश लक्ष्मीनारायण भुतडा, श्याम मधुकर कडू, चेतन महेश जोशी, वीरेंद्र दर्यावसिंह रघुवंशी (रा. आकोट) यांना क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळताना पकडण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून सट्टय़ासाठी वापरण्यात येणारे साहित्य व रोख १ लाख ३६ हजार १२0 रुपये, असा ८ लाख ९४ हजार ९२0 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब नाईक यांच्या फिर्यादीवरून आरोपी नरेश लक्ष्मीनारायण भुतडासह चौघांविरुद्ध आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कलम ४, ५ मुबंई जुगार अँक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. योगीराज ऑइल मिलवर धाड टाकल्यानंतर पोलिसांनी भुतडा यांचे बंगल्यावर छापा टाकुन बराच काळ तपासणी केली. यामध्ये काय आढळले, यांची पोलिसांनी माहिती दिलेली नाही. दरम्यान, रविवारी सर्व आरोपींना आकोट येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला.
सट्टय़ाचा तपास एटीसीकडे
आकोट येथील सट्टा प्रकरणाचा तपास एटीसीचे प्रमुख नितीन पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. तपास अधिकारी पाटील या प्रकरणाचा तपास करणार असून, या चारही आरोपींना चार दिवस सकाळी ११ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंंत नितीन पाटील यांच्यासमोर हजेरी लावण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामूळे या आरोपींना रोज अकोल्यात येऊन पाटील यांच्यासमोर हजेरी लावणे बंधनकारक आहे.