नारायण गव्हाणकर अखेर स्वगृही
By Admin | Updated: April 8, 2015 01:46 IST2015-04-08T01:46:24+5:302015-04-08T01:46:24+5:30
मुंबईत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश.

नारायण गव्हाणकर अखेर स्वगृही
अकोला - अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेले माजी आमदार नारायण गव्हाणकर यांच्या स्वगृही अर्थात भाजपमध्ये परतण्याचा मुहूर्त मंगळवारी सापडला. मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश घेतला. विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार गव्हाणकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून दोन वेळा पक्षप्रवेशाचा मुहूर्तही निश्चित केला होता. अमरावती येथे झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते पक्षप्रवेश घेण्यासाठी गेले होते; मात्र तेथे त्यांचा प्रवेश होऊ शकला नाही. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गव्हाणकरांचा पक्षप्रवेश मुंबईत होईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवारी गव्हाणकरांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी गृहराज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, भाजपचे संघटनमंत्री रवि भुसारी, सुनील कर्जतकर, खा. के.टी. अण्णा पाटील, स्मिता राजनकर, रावसाहेब घुगे उपस्थित होते.