अकोल्यात झाले होते नाना पटोले यांचे भाजप विरोधातील पहिले भाषण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 10:57 IST2019-12-02T10:57:18+5:302019-12-02T10:57:25+5:30
भाजपचे खासदार नाना पटोले यांनी सत्तापक्षात होणारी घुसमट जाहीरपणे अकोल्यात प्रकट केली होती.

अकोल्यात झाले होते नाना पटोले यांचे भाजप विरोधातील पहिले भाषण!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जनतेच्या समस्या मांडण्यासाठी मी निवडून आलो, त्या मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात एकाच वेळी सरकार स्थापन झाले. आंध्र सरकारने तीन वर्षांत जलसिंचनाची व्यवस्था केली; परंतु आमचे सरकार तापी व गोदावरी खोऱ्याचा विकास करून जलसिंचनाची व्यवस्था करू शकले नाही, असा भाजपवर थेट आरोप करून तत्कालीन भाजपचे खासदार नाना पटोले यांनी सत्तापक्षात होणारी घुसमट जाहीरपणे अकोल्यात प्रकट केली होती.
२४ सप्टेंबर २०१७ मध्ये अकोल्यातील खंडेलवाल भवन येथे भाजपाच्या विरोधात जाहीर भाषण करून नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भूमिका घेतली व पुढे दोन महिन्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. पटोले यांची रविवारी विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पटोले यांच्या अकोल्यासोबत असलेल्या ऋणानुबंधाला उजाळा मिळाला आहे.
शेतकरी जागर मंचच्या माध्यमातून कापूस, सोयाबीन व धान परिषद घेण्यासाठी या मंचचे प्रशांत गावंडे, जगदीश मुरूमकार, ज्ञानेश्वर सुलताने, मनोज तायडे, विजय देशमुख यांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. यावेळी जागर मंचने नाना पटोले यांना आमंत्रित करून त्यांची भूमिका शेतकºयांसमोर ठेवण्याची विनंती केली होती. पटोले हे भाजपचे खासदार होते; मात्र दररोज होणाºया शेतकºयांच्या आत्महत्या, शेतकºयांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना, कर्जमाफीच्या अर्जात जाचक अशी ६६ कलमे यामुळे ते व्यथित होते. दिल्ली कुणाचेही ऐकत नाही अन् राज्यात केवळ दिशाभूल होत आहे. यामुळे पटोले यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता. ते नाराज आहेत, अशी चर्चा त्यावेळी जोरात होती; मात्र त्यांनी आपली भूमिका जाहीरपणे मांडली नव्हती. ती संधी शेतकरी जागर मंचने त्यांना दिली व तेथूनच त्यांचा भाजप विरोध प्रखर झाला व त्यांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी राजीनामा दिला. त्यानंतर जागर मंचसोबत कासोधा परिषदेत ते सक्रिय झाले. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्याशी चर्चा करून त्यांनी शेतकºयांच्या प्रश्नावर राज्यभर दौरे सुरू केले, हे विशेष. कासोधा परिषदेच्या निमित्ताने अकोल्यातील हजारो शेतकºयांसोबत त्यांची नाळ जुळली. ते रविवारी विधानसभेचे अध्यक्ष झाले. त्यानिमित्ताने त्यांचा अकोल्याशी असलेल्या ऋणानुबंधाला उजाळा मिळाला आहे.