नाफेडचा शेतकऱ्यांना दुहेरी गळफास

By Admin | Updated: April 25, 2017 01:22 IST2017-04-25T01:22:43+5:302017-04-25T01:22:43+5:30

अकोटमध्ये शेतकरी संतप्त : चुकारे थकीत; तूर खरेदी बंद

Nafed farmers get double gulp | नाफेडचा शेतकऱ्यांना दुहेरी गळफास

नाफेडचा शेतकऱ्यांना दुहेरी गळफास

अकोट: अकोट बाजार समितीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून तूर उत्पादक शेतकरी आपल्या वाहनांसह खरेदीच्या प्रतीक्षेत आहे; परंतु अद्यापही दिरंगाई करणाऱ्या नाफेडने सावळा गोंधळ करीत शेतकऱ्यांना वेटिंगवर ठेवले आहे. तर दुसरीकडे मार्च महिन्यानंतरच्या खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे थकीत असून, सध्या बाजारात ३० हजार क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून, मानसिकदृष्ट्या शेतकरी खचला आहे.
अकोट बाजार समितीमध्ये १ नोव्हेंबर २०१६ ते २२ एप्रिल २०१७ पर्यंत १ लाख ८५ हजार ६९०.४९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. २२ एप्रिलपर्यंत विदर्भ को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने ५९ हजार ९९०.४९ क्विंटल खरेदी केली तर उर्वरित १ लाख २५ हजार ७०० क्विंटल तूर व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहे. सद्यस्थितीत अकोट बाजार समितीत ३९३ वाहने मोजमापाच्या प्रतीक्षेत असून, २४ हजार ५०० क्विंटल तूर पडून असल्याचा शासनाचा अहवाल आहे; परंतु प्रत्यक्षात ३० हजार क्विंटलच्यावर तूर बाजार समितीमध्ये खरेदीच्या प्रतीक्षेत असून, नाफेडने शेतकऱ्यांभोवती दुहेरी गळफास लावला आहे. एकीकडे २७ मार्च २०१७ ते २२ एप्रिल २०१७ पर्यंत खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना दिले नाहीत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यास दिरंगाई करण्यात आली. बारदान्यापासून तर विविध कारणे देत अनेकदा खरेदी चालू-बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. शिवाय गत दोन महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांची तूर बाजारपेठेत असल्याने उन्हामुळे वजनात घट आली आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासत आहे. दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना नाइलाजास्तव कमी भावात आपली तूर व्यापाऱ्यांना विकावी लागत आहे. अनेकदा तूर खरेदी बंद झाल्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आपली तूर व्यापाऱ्यांना विकावी लागली. त्यानंतर लगेच तूर खरेदी सुरू केल्याने तीच तूर व्यापारी नाफेडमध्ये शेतकऱ्यांच्याच नावाने विकत असल्याची चर्चा आहे. यामध्ये शेतकरी चांगलाच भरडला जात असून, शासनाने संपूर्ण तूर खरेदी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


शेतकऱ्यांचा एसडीओला घेराव
नाफेडने शेतकऱ्यांची तूर खरेदी २२ एप्रिलपासून बंद केली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आवारामध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या ट्रॉल्या उभ्या आहेत. तूर खरेदी बंद झाल्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांनी अकोट उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांना २४ एप्रिल रोजी घेराव घातला. यावेळी त्यांच्या कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री यांनी व्टिट्रवरून बाजार समितीच्या आवारात असलेली शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे जाहीर केल्याने तूर्त आंदोलन स्थगित करण्यात आले. सदर आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे, युवा नेते तुषार पुंडकर, सतीश देशमुख, लक्ष्मीकांत कौठकर, कृष्णराव देशमुख, गजानन बोरोकार, विक्रांत बोंद्रे, मोहन पोटदुखे, रामभाऊ खवले, शिवाजी बहाकर, राहुल पोटे, विपुल मोहोकार, विशाल उपासे, अमोल मसूरकार, सागर उकंडे, गणेश बहाकर, बाळासाहेब फोकमारे, दीपक कळमकर, विश्वजित सुपासे, माधवराव उपासे, पंकज हाडोळे, राजेश फोकमारे, अरविंद गोठवाड, विशाल भगत, शुभम नारे, गोपाल निमकर्डे, विशाल सिरस्कार, विष्णू बहाकर, जाफर खा अहेमद खा यांच्यासह बहुसंख्य शेतकरी व शेतकरी संघटनेचे तसेच विविध पक्षांचे, संघटनेचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतकरी लोकप्रतिनिधींच्या शोधात
‘अच्छे दिन’ आल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमाल चांगला भाव मिळेल, या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा सध्या मात्र तूर खरेदी बंद असल्याने अपेक्षाभंग झाला आहे. सध्या नाफेडच्या तूर खरेदीवरून शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे अकोट-तेल्हारा भागातील शेतकरी तूर खरेदी सुरू व्हावी याकरिता अधिकारी वर्गांचे उंबरठे झिजवत आहेत. दुसरीकडे मात्र शासनाचे स्थानिक लोकप्रतिनिधीं शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी शेतकरी लोकप्रतिनिधींच्या शोधात फिरताना दिसून येत आहेत.

Web Title: Nafed farmers get double gulp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.