मुस्लीम बांधव करणार गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वागत

By Admin | Updated: September 6, 2014 02:33 IST2014-09-06T02:23:49+5:302014-09-06T02:33:06+5:30

अकोला येथील गणेश विर्सजन मिरवणुकीदरम्यान ६ जनरेटर व १ हजार दिव्यांची व्यवस्था

Muslim brother welcomes Ganesh immersion procession | मुस्लीम बांधव करणार गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वागत

मुस्लीम बांधव करणार गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वागत

अकोला : अनेक वर्षांपासून शहरामध्ये गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेने पार पाडल्या जातो. हिंदू, मुस्लिमांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा केला. आम्ही अतिसंवेदनशील शहराची ओळख पुसून टाकली आहे. यंदाचाही उत्सव शांततेत पार पडणार, अशी अपेक्षा व्यक्त करीत यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे मुस्लीम बांधवही स्वागत करतील, असे अभिवचन शांतता समितीतील मुस्लीम सदस्यांनी दिले.
जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास शांतता समितीची सभा पार पडली. सभेला आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिसन बाजोरिया, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, निवासी उ पजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी उन्हाळे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, शहराचे सहायक पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष अँड. मोतीसिंह मोहता उपस्थित होते. सभेमध्ये शांतता समितीच्या सदस्यांनी अनेक प्रश्न जिल्हाधिकार्‍यांसमोर मांडले.
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वच शांतता समितीचे सदस्य प्रयत्न करतील. उत्सवाला कुठेही गालबोट लागू नये, याची खबरदारी घेतली. प्रशासनानेही रस्त्यांवरील खड्डे, पथदिव्यांची समस्या मार्गी लावण्याची मागणी शांतता समिती सदस्यांनी केली.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात हिंदू, मुस्लीम बांधव एकत्र येऊन शांततेत गणेशोत्सव पार पडतात. यंदाही आम्ही उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करू, असेही सदस्यांनी स्पष्ट केले.


* विसर्जन मार्गावर ६ जनरेटर, हजार पथदिवे
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोंधळ उडू नये, यासाठी जिल्हा प्रशासन खबरदारी घेत आहेत. विसर्जन मार्गावर मनपाच्यावतीने ६ जनरेटर व १ हजार पथदिव्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान भारनियमन होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. तसेच गणेश मंडळांनी विना डिजे मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी केले.

* मिरवणुकीवर २३ सीसी कॅमेर्‍यांचे लक्ष
गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर २३ सीसी कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेर्‍यांमार्फत मिरवणुकीतील प्रत्येक हालचालींवर लक्ष राहणार आहे. सीसी कॅमेर्‍यांचे नियंत्रण ताजनापेठ पोलिस चौकी आणि पोलिस नियंत्रण कक्षातून होणार आहे.

* विकासावर चिंतन व्हावे
पोलिस अधीक्षकांनी, हे करू नका, ते करा यावर बोलण्यापेक्षा शहरातील रस्त्यांवर खड्डे का आहेत? शहराचा विकास का झाला नाही? अशा प्रश्नांवर चिंतन होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. कायदा व नियम महत्त्वाचे आहेत. ते कोणी पाळणार नसेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई होईल. डिजे व वाद्ये वाजविण्यास मनाई नाही; परंतु आवाजाच्या र्मयादेचे भान जरूर असावे. ६५ टक्के लोकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा गुन्हा दाखल न करता, थेट कारवाईचे आदेश दिलेले आहेत, अशी माहि ती दिली.

* देश तो हमारा है..
सभेदरम्यान अँड. मोतीसिंह मोहता यांनी, पोलिस गणेश भक्तांवर जाणीवपूवर्क कारवाई करतात. गुन्हे दाखल करतात. डिजे, वाद्ये वाजविण्यास मनाई केली जाते. हे शहर आमचे आहे, तुमचे नाही. वरिष्ठ अधिकारी येथे बदलून येतात आणि जातात; परंतु त्याचे परिणाम गणेश भक्तांना भोगावे लागता त, असा मुद्दा मांडला. यावर उत्तर देताना, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी, शहर आपका है, लेकिन देश तो हमारा है..सर्वांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करावा. कायदा व नियमांचे पालनही महत्त्वाचे आहे. असे सांगितल्यावर सभागृहातील उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट केला.

* ही तर अशांतता समिती
शुक्रवारी झालेल्या सभेमध्ये शांतता समितीच्या सदस्यांनी गोंधळ घालीत, ते शांतता समितीमध्ये नव्हे तर अशांतता समितीचे सदस्य असल्याचा परिचय दिला. सभेदरम्यान शांतता समितीचे सदस्य विषय मांडण्यासाठी उभे राहत आणि अर्धा तासपर्यंत बोलत. त्यामुळे इतरांना बोलण्याची संधी मिळत नसल्याने, काही सदस्यांनी वारंवार बोलणार्‍यांविरुद्ध आक्षेप घेतला आणि सभेमध्ये गोंधळ निर्माण केला. पाच ते सहा सदस्य तर व्यासपीठापर्यंत येऊन, त्या सदस्याचे भाषण बंद करण्याचे सांगत होते.

Web Title: Muslim brother welcomes Ganesh immersion procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.