पोळा चौकातील इसमाची हत्या
By Admin | Updated: December 10, 2014 01:46 IST2014-12-10T01:46:23+5:302014-12-10T01:46:23+5:30
पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप.

पोळा चौकातील इसमाची हत्या
अकोला - पोळा चौकातील एका ४५ वर्षीय इसमाची अज्ञात मारेकर्यांनी हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली. लोणी रोडवर गंभीर जखमी अवस्थेत असताना रउफ खान सलीम खान यांना सवरेपचार रुग्णालयात दाखल केले; मात्र दुपारी १२ वाजता त्यांचा मृत्यू झाला. चौकातील देशी दारू दुकानातील कामगार व जुने शहर ठाण्यातील पोलीस कर्मचार्यांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाची पत्नी व मुलाने केला. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशीरा अज्ञात मारेकर्यांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.
पोळा चौक येथील रहिवासी रउफ खान सलीम खान (४५) हे सोमवारी रात्री चौकातील एका देशी दारूच्या दुकानावर गेले होते. या ठिकाणी त्यांचा दुकानदार व कामगारांशी वाद झाला. त्यामूळे जुने शहर पोलीस ठाण्यातील काही कर्मचार्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी व दुकानातील कामगारांनी त्यांना मारहाण केली, असा आरोप रउफ खान सलीम खान यांचा मुलगा हजरत बिलाल रउफ खान व पत्नी शबानाबी रउफ खान यांनी केला आहे. या मारहाणीनंतर मंगळवारी सकाळी रउफ खान लोणी रोडवरील एका शेताच्या बाजूला गंभीर जखमी आणि विवस्त्र अवस्थेत आढळून आले. शिवसेना वसाहतीमधील काही नागरिकांनी त्यांना सवरेपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे दुपारी १२ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पोलीस व देशी दारू दुकानातील कामगारांनी मारहाण करून त्यांना लोणी रोडवर नेऊन टाकले. यामध्येच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नी व मुलाने केला आहे. या प्रकरणाची तक्रार पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा व सहायक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे करण्यात आली असून, दोषी पोलीस कर्मचार्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्यांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.