दहा कोटींच्या विकास कामांवर महापालिकेचे शिक्कामोर्तब
By Admin | Updated: August 20, 2016 02:48 IST2016-08-20T02:48:25+5:302016-08-20T02:48:25+5:30
अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दलित वस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

दहा कोटींच्या विकास कामांवर महापालिकेचे शिक्कामोर्तब
अकोला, दि. १९: नागरी दलित वस्ती निधी अंतर्गत महापालिकेला १0 कोटींचे अनुदान प्राप्त झाले. प्रभागनिहाय अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्येच्या दरडोईनुसार मंजूर अनुदानातून १२१ विकास कामांच्या यादीवर सर्वसाधारण सभेने शिक्कामोर्तब केले.
महापालिकेच्या मुख्य सभागृहात शुक्रवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्राप्त १0 कोटींच्या अनुदानावर चर्चा करून विकास कामांना मंजुरी देण्याचा विषय ठेवण्यात आला होता. दहा कोटींच्या विकास कामांना सभागृहाने मंजुरी देण्याची मागणी सभापती विजय अग्रवाल यांनी केली. दलित वस्तीच्या निधीचे निकष लक्षात घेता ही कामे नियमानुसार करण्याचे आवाहन ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांनी सभागृहाला केले. प्राप्त निधीतून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सूचनेनुसार प्रशासनाने तयार केलेल्या १२१ विकास कामांची यादी सभागृहासमोर ठेवण्यात आली होती. सभागृहाने सर्वमताने यादी मंजूर करीत दहा क ोटींच्या विकास कामांवर शिक्कामोर्तब केले. सभा सुरू होण्यापूर्वी कावड मार्गाच्या दुरुस्तीला अद्यापही सुरुवात न केल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यावर मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे आयुक्त अजय लहाने यांनी नमूद करताच आमदार गोवर्धन शर्मा यांनी कावड मार्गाच्या दुरुस्तीचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश दिल्याचे सांगत सभापती विजय अग्रवाल यांनी मनपा प्रशासनाला ह्यपीडब्ल्यूडीह्णसोबत समन्वय साधण्याची सूचना केली. कावड उत्सवाचा अल्प कालावधी लक्षात घेता पालिकेने ७५ लाखाच्या रस्ता अनुदानातून ही कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश महापौर उज्ज्वला देशमुख यांनी दिले. रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने निकाली काढू,असे आयुक्तांनी नमूद केले.
स्विपर मशीनची खरेदी होईल
शहरात डांबरी असो वा सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्यास अवघ्या सहा महिन्यांत रस्त्यांची ऐशीतैशी होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे रस्त्यांवर धूळ निर्माण होते. रस्त्यांवरील तसेच सार्वजनिक ठिकाणी साचणारी धूळ काढण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून स्विपर मशीन खरेदी करण्याच्या विषयाला महापौर उज्ज्वला देशमुख यांनी मंजुरी दिली. कॉम्पॅक्टर खरेदीच्या विषयाला बगल देण्यात आली.
खुले नाट्यगृहासाठी प्रस्ताव मंजूर
खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी भारिप-बमसंच्या नगरसेविका अँड. धनश्री देव यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीसाठी रेटा लावला होता. तसे पत्र महापौरांनादेखील दिले. वेळेवरील विषयांत नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी २ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
घंटागाडीचा विषय भरकटला!
नागरिकांच्या घरी, दुकाने, हॉटेल, रेस्टॉरन्टसह विविध ठिकाणचा कचरा जमा करण्यासाठी प्रशासनाने ८१ वाहनांची व्यवस्था केली आहे. घंटागाडीत कचरा जमा करण्याच्या बदल्यात स्लम एरियातून दहा रुपये, इतर भागातील कुटुंबीयांकडून ३0 रुपये व हॉटेल, रेस्टॉरन्ट, मंगल कार्यालय, दुकानदार व व्यावसायिकांकडून २00 रुपये महिना शुल्क जमा करण्याची अट आहे. काही नागरिकांना शुल्क जमा करणे शक्य नसल्याने या विषयावर निर्णय घेण्याचा मुद्दा महापौर उज्ज्वला देशमुख यांनी सभागृहासमोर मांडला. या विषयात सुधारणा सुचवणे अपेक्षित असताना चर्चा भरकटल्याचे दिसून आले. चर्चेअंती कोणताही ठोस निर्णय न घेता महापौरांनी हा विषय मंजूर केल्यामुळे संभ्रमाची स्थिती उद्भवली आहे.
हुतात्मा स्मारक येथे अखंड ज्योत
स्वातंत्र्यलढय़ात आयुष्य पणास लावणार्या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. स्मारकाच्या ठिकाणी अखंड अमर ज्योत लावण्याचा विषय महापौर उज्ज्वला देशमुख यांनी सभेत मांडला. नगरसेवक सुनील मेश्राम यांनी अखंड ज्योत लावण्यासाठी निधीची तरतूद केली का, असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभापती विजय अग्रवाल, विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी अखंड ज्योत लावण्याचे सर्मथन करीत ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे मत मांडले. हा विषय महापौरांनी मंजूर केला.