पुरात अडकलेल्या मुंधडा कुटुंबाला सुरक्षित काढले!

By Admin | Updated: July 12, 2016 01:28 IST2016-07-12T01:28:32+5:302016-07-12T01:28:32+5:30

सहा तास मृत्यूशी झुंज : पिंजर व दर्यापूरच्या शोध व बचाव पथकाची कामगिरी.

The Mundhad family got trapped safely! | पुरात अडकलेल्या मुंधडा कुटुंबाला सुरक्षित काढले!

पुरात अडकलेल्या मुंधडा कुटुंबाला सुरक्षित काढले!

अकोला : दर्यापूर तालुक्यातील गयाटी नाल्याच्या पुरात अकोला येथील मुंधडा दांपत्य चालकासह रविवारी रात्री कारमध्ये अडकले होते. या तिघांना महसूल विभागाच्या शोध व बचाव पथकाने पहाटे ४ वाजता धाडसी प्रयत्न करून सुरक्षित बाहेर काढले. पट्टीचे पोहणार्‍या स्थानिक नागरिकांनीदेखील या रेस्क्यूऑपरेशनमध्ये मोलाची कामगिरी बजाविली.
अकोला येथील हृदयरोग तज्ज्ञ सुरेश मुंधडा, त्यांच्या पत्नी पुष्पा मुंधडा, कारचालक संजय गुल्हाणे हे रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अमरावतीहून अकोल्याकडे निघाले होते. ते म्हैसांग मार्ग जात होते. लासूर ते टोंगलाबाद मार्गावरील गयाटी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना कार चालकाने धाडसाने वाहन काढण्याचा साहस केला. पण अचानक पुराची पातळी वाढल्याने कारसह तिघे वाहून गेले. काही अंतरापर्यंत कार वाहत गेली आणि एका बाभळीच्या झाडाला अडकली. नशीब बलवत्तर म्हणून कार इंजीनच्या दिशेने तिरपी झाल्याचे व कारच्या काचा उघड्या असल्याने त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेले नाही. त्यांना श्‍वास घेणे शक्य झाले. कारचालक गुल्हाने याने कारच्या दारावर चढून एका झाडाचा सहारा घेतला व मदतीची हाक मागितली. पण रात्री १ वाजताची वेळ असल्याने मदतीला कोणीही धावले नाही. भ्रमणध्वनी जवळ असल्याने त्यांनी नातेवाईकांना फोन लावला.
मृत्यूशी झुंज देत असताना डॉ. मुंदडा यांनी अकोला येथील कंपाऊडरला माहिती दिली. नंतर कंपाऊडरने अकोल्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना कळविले. त्यांनी प्रकरणाची गंभीरता ओळखून दर्यापूरचे तहसीलदार राहुल तायडे यांना घटनास्थळी त्वरित जाण्याचे आदेश दिले. तसेच अकोला पोलीस व पिंजरच्या गाडगेबाबाआपत्कालीन शोध व बचाव पथक यांनाही सुचना केली हे पथक गयाटीनाल्यावर पोहोचले. साडेतीन तास रेस्क्यू ऑपरेशन चालले. सकाळी ५.३0 वाजता तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. जिल्हाधिकारी किरण गित्ते, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, तहसीलदार राहुल तायडे, ठाणेदार नितीन गवारे, येवद्याचे ठाणेदार नरेश पिंपळकर, नैसर्गिक आपत्ती व्यवस्यापन पथकप्रमुख राहुल चव्हाण, भागवत केंद्रे, मंडळ अधिकारी व्ही.आर. इंगळे, अरुण राजगुरे यांनी प्रयत्न केले.

Web Title: The Mundhad family got trapped safely!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.