मुंबई, पुणे एसटी रिकामीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:18 IST2021-03-27T04:18:55+5:302021-03-27T04:18:55+5:30
राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासोबतच प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अनेकांनी बाहेरगावी जाणे थांबविले आहे. अत्यंत आवश्यकता ...

मुंबई, पुणे एसटी रिकामीच!
राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासोबतच प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अनेकांनी बाहेरगावी जाणे थांबविले आहे. अत्यंत आवश्यकता असेल, तरच प्रवासी बाहेरगावी जाताना दिसतात. यामुळे परिवहन महामंडळानेही ज्या ठिकाणी जास्त प्रवासी ये-जा करतात अशाच बसफेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. अकोला शहरातून दरदिवशी हजारो प्रवासी बाहेरगावी जात होते, आता ही संख्या कमालीची कमी झाली आहे. १४०-१५० बसफेऱ्यांचे शेड्यूल होते. हे शेड्यूल आता कमी होत आहे. ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार बदल झाले आहेत. यामुळे अशा ठिकाणच्या बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी प्रवासी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावरही होत आहे.
--बॉक्स--
४० बस रोज
सध्या जिल्हा मुख्यालयातून विविध मार्गांवर जाणाऱ्या ४० बस कार्यान्वित आहेत. यामध्ये ग्रामीण भागासह शहरी भागाचाही समावेश आहे.
अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. खेड्यापाड्यातील प्रवासी संख्या अधिक असलेल्या एसटी बस सुरू आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा गाड्यांचा समावेश आहे.
--बॉक्स--
रातराणी केवळ एक
लांब पल्ल्याच्या दिवसा धावणाऱ्या एसटी बसना पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. लांबच्या प्रवासासाठी रातराणी गाडीला पसंती दिली जाते; परंतु या मार्गावरील प्रवासी संख्या घटल्याने अनेक ठिकाणची रातराणी बससेवा बंद करण्यात आली आहे. केवळ पुणे येथे एकमेव गाडी सुरू आहे, तर नागपूर येथून पुण्यासाठी दोन गाड्या येतात.
--बॉक्स--
केवळ दोन-चार सीट रिझर्व्ह
कोरोनामुळे प्रवासी प्रवास टाळत आहेत. आता जाणारे प्रवासीच नसल्याने प्रत्येकाला गाडीमध्ये जागा उपलब्ध होते. यातून एसटी बसमध्ये दोन-चार सीट रिझर्व्ह असल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे.
--कोट--
जिल्ह्यात लांब पल्ल्याच्या आणि मध्यम पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवासी संख्या घटली आहे. यामुळे परिवहन महामंडळाने अनेक फेरबदल केले आहेत. दैनंदिन जवळपास ४० फेऱ्या सुरू आहेत.
अरविंद पिसोळे, स्थानक प्रमुख
--बॉक्स--
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातून बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. परिस्थिती चांगली होईपर्यंत प्रवासी संख्या वाढण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या आहेत.