सप्टेंबर महिन्यात मुगाला मिळणार ६,८00 प्रति क्विंटल भाव!
By Admin | Updated: September 6, 2015 23:24 IST2015-09-06T23:24:25+5:302015-09-06T23:24:25+5:30
भारतीय कृषी विपणन केंद्राचा अंदाज.

सप्टेंबर महिन्यात मुगाला मिळणार ६,८00 प्रति क्विंटल भाव!
अकोला: राज्यात मूग पिकाला सप्टेंबर महिन्यात सरासरी ६,५00 ते ६,८00 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणार असल्याचे भाकीत कृषी विपणन माहिती केंद्राने वर्तविले आहे. यावर्षी पाऊस नसल्याने मुगाचे उत्पादन घटले आहे. या पार्श्वभूमीवर मुगाची आवक बाजारात किती राहील, याकडे व्यापार्यांचे लक्ष लागले आहे. भारतात मूग हे पीक प्रामुख्याने खरीप आणि उन्हाळी या दोन हंगामात घेतले जाते. मूग हे एक महत्त्वाचे कडधान्य नगदी पीक असून, मुगाखालील क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्र भारतात प्रथम क्रमांकावर आहे. राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात खरीप हंगामात मूग पीक घेतले जाते. तामीळनाडू, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आणि बिहार या राज्यात उन्हाळ्यात मुगाची पेरणी केली जाते. मूग हे कोरडवाहू पीक असल्याने त्याची पेरणी मौसमी पावसाच्या आगमनानंतर केली जाते. विदर्भात मुगाची पेरणी जून महिन्यात तर तोडणी ऑगस्ट महिन्यात केली जाते. बाजारात आवक सप्टेंबर महिन्यात चालू होते. महाराष्ट्रात अकोला, लातूर, अमरावती आणि जळगाव ही व्यापारी केंद्रे आहेत. मुगाचे उत्पन्न व किमतीचा कल या सर्व गोष्टींचा विचार करू न डॉ.पंदेकृविच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग व अकोला येथील एन.ए.आय.पी. कृषी विपणन माहिती केंद्राच्या संशोधन चमूने मुगाच्या लातूर बाजारपेठेतील मागील १६ वर्षांच्या कालावधीत मासिक सरासरीचे पृथ्थकरण केले आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार बाजारात चालू स्थिती कायम राहिल्यास, समतोल हवामानात वेगवेगळ्य़ा प्रतिनुसार मुगाच्या सप्टेंबर २0१५ महिन्यात सरासरीच्या किमती जवळपास ६,६00 ते ६,८00 रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता आहे. आयात-निर्यात धोरणात झालेले बदल तसेच सद्यस्थितीत हवामानात होणार्या बदलाचा परिणाम मुगाच्या किमतीवर होऊ शकतो. यावर्षी पाऊस कमी झाल्याने मुगाच्या पिकावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. यासाठीच बाजारातील मुगाच्या किमतीचा आढावा घेतला असता, या सप्टेंबर महिन्यात ६,८00 प्रतिक्विंटल भाव मिळण्याची शक्यता आहे. ही माहिती शेतकर्यांना विक्री व साठवणुकीचा योग्य निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे कृषी अर्थशास्त्र विभागाचे डॉ. राजेंद्र देशमुख यांनी सांगीतले.