मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरचा वावर म्हणजे ‘तारे जमीपर ’ !
By Admin | Updated: May 10, 2017 07:42 IST2017-05-10T07:27:30+5:302017-05-10T07:42:46+5:30
जलसंधारणाच्या केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी सिनेसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला साक्षात यावे लागले.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरचा वावर म्हणजे ‘तारे जमीपर ’ !
अकोला : पातूर तालुका हा अकोल्यातील आदिवासीबहुल तालुका. सर्वच बाबतीत दुर्लक्षित असा परिसर; मात्र या तालुक्याचा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग झाला अन् या भागातील गावकऱ्यांनी संधीचं सोनं करीत अवघ्या राज्यात श्रमदानातून जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला. चारमोळी, शिर्ला ही या तालुक्यातील प्रातिनिधीक गावे. येथील ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी सिनेसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला साक्षात यावे लागले. नेहमी पडद्यावर दिसणारा हा हीरो प्रत्यक्षात सामान्य व्यक्तीसारखा वावरला. ग्रामस्थांशी बोलला, प्रेमाने खांद्यावर हात ठेवला. हा साधेपणा ग्रामस्थांना भारावून टाकणारा होताच, सोबतच आमिरसारखा सुपरस्टार जमिनीवर असल्याचा प्रत्यय देणारा ठरला.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने चित्रपट अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव मंगळवारी अकोल्यात येणार, यावर अनेकांचा विश्वासही बसत नव्हता; मात्र आमिरला घेऊन येणारे विमान सकाळी ८.५३ वाजता विमानतळावर उतरले अन् विनम्रपणे हात जोडत आमिर खान विमानाच्या बाहेर आला. त्याचे यथोचित स्वागत करण्यात आले.
त्यानंतर ते थेट चारमोळी गावाकडे निघाले. त्या ठिकाणी आमिरला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. जो तो आमिरला जवळून बघता यावे म्हणून धडपडताना दिसत होते. यात प्रशासनाचे अधिकारी आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांचाही समावेश होता.
आमिर खान व त्यांच्या पत्नी किरण राव या सहजतेने वावरत होत्या. सुरक्षेचा बडेजाव नाही. वैशाखातील उन्हाच्या चटक्यांची तक्रार नाही. चारमोळी व शिर्ला या दोन्ही गावात बोलताना आमिर म्हणाले की, जलसंधारणाचे काम पाहून मला आणि किरणला मोठा आनंद झाला आहे. हे काम मला जगण्याची ऊर्जा देते. ही एकमेव स्पर्धा आहे की, ज्यामध्ये कुणीही हरत नाही. आमिर यांच्या वागण्यातील सहजताच गावकऱ्यांची मने जिंकत जलसंधारणाचा संदेश देऊन गेली.