श्री गजानना अवलीया अवतरले जग ताराया
By Admin | Updated: February 12, 2015 00:19 IST2015-02-12T00:19:43+5:302015-02-12T00:19:43+5:30
शेगाव येथे श्री गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात; १४१५ भजनी दिंड्यांचा सहभाग,लाखो भक्तांना महाप्रसाद.

श्री गजानना अवलीया अवतरले जग ताराया
गजानन कलोरे /शेगाव (जि. बुलडाणा) : संत श्री गजानन महाराज यांचा प्रगटदिन सोहळा लाखो भक्तांच्या उपस्थितीत आज बुधवार दि. ११ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला.
तुम्ही संत मायबाप कृपावंत
काय मी प्रतीत किर्ती वर्णवू
अवतार तुम्हा धराया कारण
उध्दराया जन.. जंड.. जिवा
संतनगरी शेगाव येथे श्री गजाननाचा हा अवतार माघ वद्य ७ ला या जड-जिवाचा उध्दार करण्यास्तव संतनगरीत १३६ वर्षापूर्वी झाला. त्यावेळी त्यांनी अन्न परब्रह्मची महंती स्वताच्या कृतीतून या विश्वाला सांगितली. संत श्री गजानन महाराजांचा प्रगटमहोत्सव संस्थानमध्ये आज दुपारी १२ वाजता सनई चौघडा, ढोल नगारा व हजारो भक्तांच्या जयजयकारात बेलफुले, गुलाब यांची उधळन करुन मोठय़ा भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या उत्सवात राज्यभरातून १ हजार ४१५ भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ४२ हजार ६१९ वारकरी आणि व्यवस्थेसह आलेल्या ७१ भजनी दिंड्या होत्या. यामधील निवासी दिंड्या ३८८ असून त्यांची निवासी वारकरी संख्या १९ हजार ४५0 होती. संस्थानच्या नियमाची पूर्तता केलेल्या १३३ भजनी दिंड्यांना भजनी साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान (मदत) श्री संत वाड्मय वितरण, दवाखाना व्यवस्था व ८ दिंड्यांना शिधा वितरण करण्यात आले. सोबतच लाखो श्री भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
या उत्सवात सुरु झालेल्या महारुद्रस्वाहाकार यज्ञाची पूर्णाहुती संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र डांगरा, विश्वस्त निळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, पंकजभाऊ शितूत, विश्वेश्वर त्रिकाळ, किशोरबापू टांक व चंदुलाल अग्रवाल उपस्थित होते.
श्री गजानन महाराजांच्या पालखीची संस्थानच्या प्रांगणातून दुपारी २ वाजता नगरपरिक्रमा काढण्यात आली.