अनुशेष दूर करण्यासाठी खासदार, आमदारांनी पुढाकार घ्यावा!
By Admin | Updated: April 5, 2016 01:37 IST2016-04-05T01:37:52+5:302016-04-05T01:37:52+5:30
वर्षभरात विदर्भासाठी २१00 कोटी खर्च होणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन.

अनुशेष दूर करण्यासाठी खासदार, आमदारांनी पुढाकार घ्यावा!
अकोला: पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा, अकोला आणि वाशिम या चार जिल्ह्यांमध्ये सिंचनाचा मोठा अनुशेष आहे. हा अनुशेष दूर करण्यासाठी या जिल्ह्यांमधील आमदार, खासदारांनी पुढाकार घेण्याचे आवाहन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
अकोला येथे सोमवारी आयोजित कृतज्ञता सोहळय़ातील सत्काराला उत्तर देताना अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी विदर्भाच्या विकासासाठी भाजप सरकारने वर्षभरात २१00 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले. यापूर्वी हा खर्च कधीही ८00 कोटी रुपयांच्या पुढे गेला नव्हता. सिंचनाचे दोन हजार कोटी रुपये बँकेत पडून आहेत. विकासावर खर्च होत नसल्याने अकोला, वाशिम, बुलडाणा आणि अमरावती या जिल्ह्यांतील अनुशेष वाढत आहे. हा अनुशेष दूर करण्यासाठी खा. संजय धोत्रे, आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह या भागातील आमदार, खासदारांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. जगाचा पोशिंदा शेतकरी १ ग्रॅम बियाणे टाकून १00 पट उत्पादन घेतो. त्याच्या १ ग्रॅम बियाण्याला एक थेंब देऊ शकलो, तर शेतकर्यांच्या डोळय़ांत कधीच अश्रू दिसणार नाहीत. त्यासाठी आमदार, खासदारांनी पुढाकार घेऊन सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले