पानपिंपळी, सफेद मुसळी पिकांचा पीक तारण योजनेत समावेश करण्याच्या हालचाली
By रवी दामोदर | Updated: September 23, 2022 10:40 IST2022-09-23T10:39:47+5:302022-09-23T10:40:20+5:30
विभागीय कृषी सहसंचालकांकडून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाला पत्र

पानपिंपळी, सफेद मुसळी पिकांचा पीक तारण योजनेत समावेश करण्याच्या हालचाली
अकोला: शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टिकोनातून कृषी पणन मंडळाकडून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे. या पीक तारण योजनेमध्ये पानपिंपळी, सफेद मुसळी पिकांचा समावेश करण्याच्या हालचालींना वेग आला असून, या संदर्भात विभागीय कृषी सहसंचालकांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाला पत्र देऊन आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्याचे सुचविले आहे. त्यामुळे औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यासह अमरावती विभागात पानपिंपळी, सफेद मुसळी पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. मात्र दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्ती व कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. दरवर्षी पानमळा व औषधी वनस्पती संदर्भात उत्पादक शेतकऱ्यांना उद्भवत असलेल्या समस्या व अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यासाठी शेतकऱ्यांना उपाययोजना सुचविण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली औषधी वनस्पती उत्पादक शेती व शेतकरी विकास अभियान ही विभागस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून पानपिंपळी, सफेद मुसळी इ. औषधी वनस्पती पिकांचा पीक तारण योजनेत समावेश करण्याच्या सूचना विभागीय स्तरीय समितीच्या बैठकीत सुचविल्या. त्याअनुषंगाने विभागीय कृषी सहसंचालकांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाला पत्र देऊन पानपिंपळी व सफेद मुसळी इ.औषधी वनस्पती पिकांचा पीक तारण योजनेमध्ये समावेश करणेबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे सुचविले आहे.
अकोट व तेल्हारा तालुक्यात औषधी वनस्पती पिकांचा पेरा
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोर्डी येथील शेतकरी जगन्नाथजी धर्मे यांनी १९९२ पासून त्यांनी सफेदमुसळीच्या व्यापारीतत्त्वाच्या लागवडीस सुरुवात केली होती. तेव्हापासून बोर्डीसह रामापूर, धारूर, लाडेगाव आदी शिवारात सफेद मुसळीचे पेरणी क्षेत्र वाढत चालले आहे. तसेच अकोट, तेल्हारा तालुक्यात पानपिंपळीचे उत्पादन दानापूर, उमरा, पणज, बोर्डी, हिवरखेड आदी शिवारात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते.