ग्रामसेवकांचे आंदोलन स्थगित
By Admin | Updated: July 17, 2014 01:50 IST2014-07-17T01:35:42+5:302014-07-17T01:50:50+5:30
ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाचा सकारात्मक निर्णय; आंदोलन स्थगित

ग्रामसेवकांचे आंदोलन स्थगित
अकोला- वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करणार्या ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने हे आंदोलन बुधवारी स्थगित करण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतचे कारभार पुन्हा रुळावर येणार आहेत. वेतन वाढ, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा आणि कंत्राटी कामगारांचे प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी १ जुलैपासून राज्यातील ग्रामसेवक संपावर होते. ग्रामसेवकांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रशासकीय कामे ठप्प झाली होती. ऐण पेरणीच्या काळात ग्रामपंचायतमधून कोणतेही दाखले मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. मुंबई येथे आझाद मैदानावर ग्रामसेवकांनी बुधवारी धरणे दिले. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामसेवकांच्या मागण्यांवर चर्चा होऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती ग्रामसेवक युनियनचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य उल्हास मोकळकर आणि जिल्हा सचिव रवी काटे यांनी दिली.