अप्पर आयुक्त, प्रकल्प अधिकार्यांच्या अटकेसाठी हालचाली
By Admin | Updated: August 15, 2014 01:41 IST2014-08-15T01:38:02+5:302014-08-15T01:41:24+5:30
अकोला जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागातील जनरेटर घोटाळा; एसीबीने लावली राज्यभर ‘फिल्डिंग’

अप्पर आयुक्त, प्रकल्प अधिकार्यांच्या अटकेसाठी हालचाली
अकोला : एकात्मिक आदिवासी विकास विभागातील लाखो रुपयांच्या जनरेटर घोटाळ्यातील आरोपी अप्पर आयुक्त आणि प्रकल्प अधिकार्यांच्या अटकेसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी अकोला एसीबीने त्यांच्या पाच जिल्ह्यातील कार्यालयांना आरोपींच्या अटकेसाठी गुरुवारी फॅक्स पाठविले.
२0१0-११ साली विदर्भ वैधानिक विकास मंडळातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी २0 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या अमरावती येथील अप्पर आयुक्तांच्या अखत्यारित अकोला, धारणी आणि पांढरकवडा येथील एकात्मिक विकास अधिकारी कार्यालये येतात. या कार्यालयांतर्गत येणार्या आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी जी.एस. एंटरप्राईजेसकडून एकूण ५0 जनरेटर खरेदी करण्यात आले. या खरेदी प्रक्रियेबाबत तक्रार झाल्यानंतर अकोला एसीबीने चौकशी केली. तिन्ही प्रकल्प कार्यालयांतर्गत राबविण्यात आलेल्या खरेदी प्रक्रियेत एकूण ६६ लाख ९८ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे या चौकशीतून स्पष्ट झाले होते.
याप्रकरणी अकोला, धारणी आणि पांढरकवडा येथे अप्पर आयुक्त विश्वंभर वरवंटकर, प्रकल्प अधिकारी महेंद्रसिंग माणिकसिंग खोजरे आणि जी.एस. एंटरप्राईजेसचा मालक शब्बीर अली मोहम्मद अली, पांढरकवडा येथील तत्कालीन प्रकल्प अधिकारी सारंग कोंडलकर यांच्याविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले
होते.
असा झाला घोटाळा..
एकात्मिक आदिवासी विकास विभागाने औरंगाबाद येथील युनायटेड जनसेट या कंपनीशी दर करार केला. या कंपनीने जनरेटर पुरवठय़ासाठी मुंबई येथील जी.एस. एंटरप्राईजेसची नेमणूक केली. त्यानंतर खरेदीसाठी प्रकल्प कार्यालयाने जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी घेतली. यासाठी कंपनीची बोगस कागदपत्रे तयार करण्यात आली. दर करारामध्ये प्रती संच १ लाख ७९ हजार ३२ रुपये किंमत असतानाही २ लाख २२ हजार ९८0 रुपये या दराने संच खरेदी करण्यात आले.
एक आरोपी मंत्रालयात ओएसडी..
जनरेटर घोटाळ्यातील आरोपींमध्ये पांढरकवडा येथील तत्कालीन प्रभारी प्रकल्प विकास अधिकारी सारंग कोंडलकरचाही समावेश आहे. कोंडलकर हा उपविभागीय अधिकारी होता. तो सध्या विधानसभा उपाध्यक्ष आमदार वसंत पुरके यांचा ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) आहे. एसीबीच्या अकोला युनिटने आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू झाल्याने सर्वांचेच धाबे दणादणले आहेत.
खोजरे यापूर्वीच्याही गुन्ह्यात आरोपी
एकात्मिक आदिवासी विकास विभागातील लाखो रुपयांच्या जनरेटर घोटाळ्यातील आरोपी प्रकल्प अधिकारी महेंद्रसिंग माणिकसिंग खोजरे हा २0१३ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातीलही आरोपी आहे. वन्य प्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी सौर उर्जेवर आधारित कुंपणाची योजना राबविण्यात आली होती. या योजनेत ३८ लाख ५३ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचे उजेडात आले होते. खोजरे हा सहाय्यक वनसंरक्षक पदावर कार्यरत होता.