जमीन अधिग्रहण विरोधात खासदारांच्या घरासमोर आंदोलन

By Admin | Updated: April 6, 2015 02:09 IST2015-04-06T02:09:39+5:302015-04-06T02:09:39+5:30

शेतकरी जागर मंचासह राजकीय पक्षही झाले सहभागी.

Movement against MPs' house against land acquisition | जमीन अधिग्रहण विरोधात खासदारांच्या घरासमोर आंदोलन

जमीन अधिग्रहण विरोधात खासदारांच्या घरासमोर आंदोलन

अकोला - केंद्र शासनाच्या जमीन अधिग्रहण कायद्याचा विरोध करत शेतकरी जागर मंचाने रविवारी खासदार संजय धोत्रे यांच्या घरासमोर भजन आंदोलन केले. या आंदोलनात विविध सामाजिक व राजकीय पक्ष सहभागी झाले होते. गत काही दिवसांपासून केंद्र शासनाच्या जमीन अधिग्रहण कायद्याला देशभरात विरोध होत आहे. जमीन अधिग्रहणामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान होणार असल्याने विरोधी पक्ष व सामाजिक संघटना कायद्याचा विरोध करीत आहेत. जिल्ह्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट असून, केंद्र शासनाच्या जमीन अधिग्रहण कायद्यामुळे शेतकर्‍यांना कोणत्याच प्रकारचा फायदा मिळणार नाही. शेतकर्‍यांच्या विरोधी असलेला जमीन अधिग्रहण कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष एकत्र आले. या सर्व संस्था व राजकीय पक्षांनी रविवार, ५ एप्रिल रोजी खा. धोत्रे यांच्या निवासस्थानासमोर भजन आंदोलन केले. आंदोलनात अजिंक्य अँडव्हेंचर ग्रुप, ऑनेस्टी संस्था, महाराष्ट्र बसव परिषद आदी सामाजिक संघटनांसोबतच समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र युवा परिषद, युवक काँग्रेस, छावा संघटना, आम आदमी पार्टी आदी राजकीय पक्ष सहभागी झाले होते. दरम्यान, कुठल्याही प्रकारची विपरीत घटना घडू नये व परिस्थिती नियंत्रणात राहावी, या अनुषंगाने खा. धोत्रे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. भजन आंदोलनानंतर उपस्थित सामाजिक संस्था व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार धोत्रे यांना जमीन अधिग्रहण कायदा रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन दिले.

Web Title: Movement against MPs' house against land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.