श्रमदान करून साजरा केला ‘मदर्स डे’
By Admin | Updated: May 14, 2017 04:13 IST2017-05-14T04:13:02+5:302017-05-14T04:13:02+5:30
शिर्ला येथे जलसंधारणाच्या कामांना आला वेग!

श्रमदान करून साजरा केला ‘मदर्स डे’
शिर्ला : पावसाचे पाणी जमिनीत मुरावे, यासाठी अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्यावतीने वॉटर कप स्पर्धा राबवण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शिर्ला येथे श्रमदानाचे तुफान आले आहे. १४ मे रोजी मदर्स डे साजरा होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला गावातील सात माय-लेकींनी सलग दोन तास श्रमदान करून ह्यमदर्स डेह्ण साजरा केला.
गावाच्या दुष्काळ मुक्तीसाठी शिर्ला येथे ग्रामस्थांसह अधिकारी, पदाधिकारी श्रमदान करीत आहेत. या गावाला नुकतीच अभिनेता आमिर खान यांनी त्यांची पत्नी किरण राव यांच्यासह भेट दिली होती. त्यामुळे ग्रामस्थांचा उत्साह आणखी वाढला असून, श्रमदानाला वेग आला आहे. वॉटर कप मिळवण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बुद्ध पौर्णिमेला एक हजार उपासकांनी श्रमदान केले होते. शिर्ला येथे श्रमदानातून आगळे-वेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणजे सात मायलेकींनी श्रमदानासाठी पुढाकार घेऊन सलग दोन तास श्रमदान केले. यावेळी कंटूर बांधाची निर्मिती करून खर्या अर्थाने ह्यमदर्स डेह्ण साजरा केला. या श्रमदानात गावच्या सरपंच रीना शिरसाट, स्पर्श संघटनेच्या सीमा ताकसांडे, रेखा गवई, मेघा इंगळे, प्रीती उगले, शामल गवई, मृणाल इंगळे, लीला इंगळे, स्वाती इंगळे, सानिका उगले आदींनी सहभाग घेतला.
शिर्ल्यात जलसंधारणाच्या कामाला वेग
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत शिर्ला येथील जलसंधारणाच्या विविध कामांना गती आली आहे. समतल चर,अनघड बांध, माती तलाव, ढाळीचे बांध, पाझर तलावांचा गाळ काढणे, अस्तिवातील पाणी वाहून जाणार्या बांधाची पाणी धारण क्षमता वाढवणे, सुवर्णा नदीत पाणी साठवण क्षमता डोह तयार करणे, कंटुर बांध, कंपार्टमेंट बंडींग, सिमेंट प्लग, बांध बंदीस्ती, जुन्या बंधार्यातील गाळ काढणे, खोलीकरण करून बंधार्याची पाणी धारण क्षमता वाढवणे, विहीर पुनर्भरण करणे आदींसह विविध जलसंधारणाची कामे अंतिम टप्प्यात आहेत.