‘मदर डेअरी’च्या ठरावाचे भिजत घोंगडे; सुशिक्षित बेरोजगारांचे मनपाकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:31 IST2018-08-31T13:28:29+5:302018-08-31T13:31:04+5:30
अकोला : विदर्भातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून मदर फु्रट अॅण्ड व्हिजिटेबल प्रा.लि. दिल्लीच्यावतीने एप्रिल २०१८ मध्ये महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी ‘मदर डेअरी’ उभारण्यासाठी सर्व्हे करण्यात आला होता.

‘मदर डेअरी’च्या ठरावाचे भिजत घोंगडे; सुशिक्षित बेरोजगारांचे मनपाकडे लक्ष
अकोला : विदर्भातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून मदर फु्रट अॅण्ड व्हिजिटेबल प्रा.लि. दिल्लीच्यावतीने एप्रिल २०१८ मध्ये महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी ‘मदर डेअरी’ उभारण्यासाठी सर्व्हे करण्यात आला होता. सर्व्हेदरम्यान शहरातील १८ ते २० जागा निश्चित करण्यात येऊन तसा प्रस्ताव मनपाकडे सादर केला. या प्रस्तावाला महासभेने सर्वानुमते मंजुरी दिली. मनपाने तसा ठराव शासनाकडे सादर करणे अपेक्षित असताना तो मनपात धूळ खात पडून असल्याची माहिती आहे.
गायीच्या दुधापासून तयार केलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रांमध्ये विविध ठिकाणी ‘मदर डेअरी’ उभारल्या जाणार आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील सुक्षिशित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने शहरी भागात ‘मदर डेअरी’ प्रकल्प स्थापित करण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या निर्देशानुसार मदर फ्रुट अॅण्ड व्हिजिटेबल प्रा.लि. दिल्लीच्या प्रतिनिधींनी प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामध्ये अकोला शहराचा समावेश आहे. सर्व्हेचा प्रस्ताव मनपाकडे सादर केल्यानंतर हा प्रस्ताव प्रशासनाकडे पडून होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने लिखाण केल्यानंतर प्रशासनाने पुढील मंजुरीसाठी महासभेसमोर सादर केला. सुशिक्षित बेरोजगारांची समस्या लक्षात घेता जुलै महिन्यात पार पडलेल्या महासभेत सर्वानुमते हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामध्ये डेअरी उभारण्यासाठी महापालिका क्षेत्रातील १९ जागांना मंजुरी देण्यात आली होती.
सत्ताधाºयांचे दुर्लक्ष का?
शहरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणाºया केंद्र व राज्य शासनाच्या या प्रकल्पाकडे मनपातील सत्ताधारी भाजपाचे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित होत आहे. डेअरीच्या ठरावाला मान्यता मिळाल्यानंतरही ती प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.
नागपूर, वर्धा शहरात दुधाची विक्री!
‘मदर डेअरी’ प्रकल्पांतर्गत नागपूर, वर्धा शहरात गायीच्या दुधाचे संकलन व विक्री सुरू झाली आहे. अकोला, अमरावती आणि चंद्रपूर शहरात हा विषय प्रशासकीय लालफीतशाहीत अडकल्याचे चित्र दिसून येत आहे.